बिलोली तालुक्यात जि.प.च्या ३५ शाळांत सेमी इंग्रजीचा प्रयोग
By Admin | Updated: July 24, 2014 00:26 IST2014-07-24T00:08:30+5:302014-07-24T00:26:40+5:30
बिलोली : इंग्रजी माध्यमांकडे शिक्षणाचा कल पाहता बिलोलीच्या शिक्षण विभागाने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदांच्या ३५ प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला

बिलोली तालुक्यात जि.प.च्या ३५ शाळांत सेमी इंग्रजीचा प्रयोग
बिलोली : इंग्रजी माध्यमांकडे शिक्षणाचा कल पाहता बिलोलीच्या शिक्षण विभागाने खेड्यापाड्यातील जिल्हा परिषदांच्या ३५ प्राथमिक शाळेत सेमी इंग्लिशचा प्रयोग सुरू केला असल्याची महिती गटशिक्षण अधिकारी माधव सलगर व विस्तार अधिकारी डी. व्ही. धुळशट्टे यांनी दिली.
तालुक्यात जिल्हा परिषदेअंतर्गत चालणाऱ्या ९१ शाळा आहेत. प्रामुख्याने शहरी व मोठ्या गावात खाजगी संस्थेच्या शाळा आहेत. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. शिक्षण विभागाकडून पाठ्यपुस्तके पुरवठा केली जातात, बदलत्या शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि इंग्रजी शाळेत वाढलेला कल आणि पालकांची इंग्रजी माध्यमांत शिकविण्याची मानसिकता पाहता जि.प.मधील शाळेत बदल आवश्यक आहेत. याच अनुषंगाने बिलोली शिक्षण विभागाने जून महिन्यात सर्व मुख्याध्यापकांची मते जाणून घेतली व शिकवणीसाठी किती शिक्षक पात्र आहेत व खेड्यापाड्यातील शाळांना इंग्रजीचे पाढे पहिली पासून सुरू झाले.
तालुक्यातील ९१ जि.प. शाळांपैकी ३५ शाळांच्या शिक्षक कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. शिक्षण विभागाकडून शिकवणीसाठी प्रत्येक शाळांना पुस्तके देण्यात आली आहेत.
केंद्रीय प्राथमिक शाळा बिलोली पाठोपाठ जि.प. डोणगाव, कुंडलवाडी, अटकळी, कार्ला खुर्द, चिटमोगरा, पिंपळगाव, बडूर, अर्जापूर, तोरण, दुगाव, कुंभारगाव, केसराळी, कार्ला बुद्रुक अशा शाळांमध्ये चिमुकले इंग्रजी पाढा गिरवित आहेत. जिल्हा परिषदांमधील शाळांत सेमी इंग्रजी सुरू झाल्याने पालकांत समाधान व्यक्त होत आहे. मार्च २०१४ च्या बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालात तालुका जिल्ह्यात प्रथम स्थानावर आलेला अहे. त्यामुळे शिक्षण विभागाचे मनोबल उंचावले आहे. पुढच्या वर्षात जि.प.च्या सर्वच शालांत सेमी इंग्लीश उपक्रम राबवण्याचा मानस आहे, असे सांगण्यात आले.
दरम्यान, यासाठी सेमी इंग्लीश अभ्यासक्रमांवर आधारित पाठ्य- पुस्तके पुरवठा करावे लागतील. यासाठी पाठपुरावा करावा लागेल, असेही कळाले.
जि.प.च्या शाळांत असा उपक्रम सुरू झाल्याने खाजगी संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढलेली मानसिकता पाहता सेमी इंग्लिशची प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी येईल. (वार्ताहर)