भाजीपाल्याची बेभाव विक्री
By Admin | Updated: May 7, 2014 23:59 IST2014-05-07T23:57:10+5:302014-05-07T23:59:11+5:30
परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

भाजीपाल्याची बेभाव विक्री
परतूर : भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने उत्पादक तसेच विक्रेतेही चांगलेच अडचणीत सापडले आहेत. लागवड खर्चही निघत नाही. त्यातच मालवाहतुकीचा तोटा टाळण्यासाठी उत्पादक शेतकरी अक्षरश: जनावरांना चारा म्हणून भाजीपालाच टाकू लागले आहेत. भेंडी १५ ते २० रुपये, चवळी २० ते ३५रुपये, कांदा १० रुपये, गवार २० रुपये, वांगे, १५, टोमॅटे १५ रुपये किलो दर विक्री होत आहेत. पालक, मेथी तसेच कोथिंबीर जुडी दोन ते तीन रुपयांना विक्री होत आहे. हे दर अगदी किरकोळ असल्याचे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे. भाजीपाला विकला तर भाजी नाही, तर पाला असे भाजीपाल्याबाबत म्हटले जाते. सध्या ते सत्यात उतरत आहे. यावर्षी सर्वत्र पाणीपातळी उत्तम असल्याने सर्वच पिकांना पाणी मुबलक मिळत आहे. तालुक्यात भाजीपाल्याची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यातच उत्पादन चांगले आल्याने टोमॅटो, भेंडी, वांगी, गवार, चवळी, कोबी, पालक आदी भाज्यांना किरकोळ भाव मिळत आहे. तो परवडत नसल्याने तो थेट जनावरांना वैरण म्हणून टाकला जात आहे. कांद्याचे भाव तर मोठ्या प्रमाणात गडगडल्याने कांदा विक्रेत्यांसह उत्पादकाच्यांही डोळ्यांत पाणी आणत आहे. यासंदर्भात भाजीपला विक्रेते दत्ता घनवट व भोकरे म्हणाले की, भाजीपाल्याला भाव नसल्याने मोठे नुकसान होत आहे. नफा होणे तर दूरच कधी-कधी घरातूनच पैसे जातात असेही ते म्हणाले. (वार्ताहर) दुसरा झटका गारपिटीत पिकांचे नुकसान झाल्याने अगोदरच अनेक शेतकरी गारद झाले. त्यातून अपवादानेच कोणी सुटले. मात्र तरीही उभारी घेण्यासाठी भाजीपाल्याकडे वळलेल्या शेतकर्यांना दर घसरणीचा दुसरा झटका बसला आहे.