उच्चपदस्थ अधिकारी घेणार टॉयलेटसोबत ‘सेल्फी’ !
By Admin | Updated: July 31, 2016 01:14 IST2016-07-31T00:53:53+5:302016-07-31T01:14:00+5:30
संजय तिपाले , बीड जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व जि.प. सीईओ नामदेव ननावरे या तीन प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर सात जण लवकरच

उच्चपदस्थ अधिकारी घेणार टॉयलेटसोबत ‘सेल्फी’ !
संजय तिपाले , बीड
जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर व जि.प. सीईओ नामदेव ननावरे या तीन प्रमुख अधिकाऱ्यांसह इतर सात जण लवकरच टॉयलेटसोबत सेल्फी घेणार आहेत. गेवराई येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या १० उपेक्षित व गरजू मुलींच्या घरी बांधण्यात येणाऱ्या शौचालयांचा खर्च या अधिकाऱ्यांनी उचलला आहे. यातून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडू लागले आहे.
सीईओ ननावरे यांच्या संकल्पनेतून ‘नातं जबाबदारीचं’ ही मोहीम राबविली जात आहे. वेगवेगळ्या विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले गरजू नातेवाईक, मित्रांना शौचालय बांधून द्यायचे आहे. शौचालय बांधल्यावर सेल्फी काढून तो जि.प. ला पाठवायचा आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात २५ हजार कर्मचाऱ्यांना सहभागी करुन घेण्याचे उद्दिष्ट ननावरे यांनी ठेवले आहे. शौचालयासाठी शासन अनुदान देते; परंतु आधी स्वत: लाभार्थ्याला पैसे खर्च करावे लागतात. जगण्याशीच संघर्ष असणाऱ्यांची शौचालय बांधण्याची ऐपत नसते. त्यामुळे यातून अनेकांना लाभ होणार आहे.
दरम्यान, ननावरे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अधीक्षक अनिल पारसकर यांच्याकडे ही संकल्पना मांडली, ‘जबाबदारीच्या नात्या’ची शिकवण देणारी ही मोहीम जिल्हाधिकारी राम, अधीक्षक पारसकर यांनीही उचलून धरली. गेवराई येथील कस्तुरबा गांधी विद्यालयातील दहा गरजू मुलींच्या घरी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी तलवाडा, पोलीस अधीक्षक खेर्डावाडी व जि.प. सीईओ नंदपूर कांबी येथील विद्यार्थिनीला शौचालय बांधून देतील. ५ सप्टेंबर २०१६ पर्यंतची ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे.
जिल्हाधिकारी राम, पोलीस अधीक्षक पारसकर यांनी मोहिमेसाठी वैयक्तिक योगदान दिल्याने प्रोत्साहन मिळाल्याचे ननावरे यांनी सांगितले. शौचासाठी उघड्यावर गेल्याने अपघात, सर्पदंश झाल्याच्या घटना अनेक ठिकाणी झाल्या आहेत. शिवाय घाणही पसरते, त्यामुळे सामाजिक उत्तरदायित्व म्हणून याकडे सर्वांनी पहावे, असे आवाहन त्यांनी केले.