सेल्फीवर शिक्षक नाराज
By Admin | Updated: November 6, 2016 00:42 IST2016-11-06T00:41:45+5:302016-11-06T00:42:49+5:30
लातूर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान गतिमान करण्यासाठी नुकताच शासनाने सेल्फीचा आदेश काढला आहे़

सेल्फीवर शिक्षक नाराज
लातूर : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान गतिमान करण्यासाठी नुकताच शासनाने सेल्फीचा आदेश काढला आहे़ या आदेशाबाबत लातूर जिल्ह्यातील विविध शाळांतील सुमारे १०० शिक्षकांशी चर्चा केली असता यातील ८५ टक्के शिक्षकांनी या धोरणाचा निषेध करून नाराजी दर्शविली आहे़ तर १५ टक्के शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे़ ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणामधून समोर आली आहे़
शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी विद्यार्थ्यांचे गट तयार करून आपल्या मोबाईलद्वारे शिक्षकांना विद्यार्थ्यासोबत सेल्फी काढायची आहे़ सेल्फीच्या फोटोमधील विद्यार्थ्यांची नावे आणि त्याचा आधार क्रमांक सेल्फी सरळ प्रणालीमध्ये अपलोड करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशात नमूद केल्या आहेत़ शिक्षकांनी सेल्फी काढायचे की अध्यापन करायचे हा प्रश्न शिक्षकांत चर्चिला जात आहे़ शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनासमोर आ वासून उपस्थित असतानाही शासन मात्र यावर दुर्लक्ष करीत आहे़ या शासनाच्या धोरणाबाबत राज्यभरातील शिक्षकांतून टीकेची झोड उठली आहे़