स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी केले उमेदवार आयात..!
By Admin | Updated: September 28, 2014 00:41 IST2014-09-28T00:34:08+5:302014-09-28T00:41:44+5:30
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात १२५ उमेदवारांचे २१० अर्ज दाखल झाले आहेत. प्रमुख पक्ष यंदा प्रथमच स्वबळ आजमावित असल्याने

स्वबळाची भाषा करणाऱ्यांनी केले उमेदवार आयात..!
विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यात १२५ उमेदवारांचे २१० अर्ज दाखल झाले आहेत. प्रमुख पक्ष यंदा प्रथमच स्वबळ आजमावित असल्याने जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढती रंगणार आहेत. दरम्यान, स्वबळाची पाठराखण करणाऱ्या प्रमुख पक्षांना अनेक ठिकाणी इतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागल्याचे शनिवारी दिसून आले. दरम्यान,
उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातील लढत सर्वाधिक चुरशीची होणार असून, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. येथे शिवसेनेचे विद्यमान आ. ओम राजेनिंबाळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी राज्यमंत्री राणाजगजितसिंह पाटील उभे ठाकले असून, काँग्रेसने पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. भाजपाकडून अनेक पदाधिकारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र अखेरच्या क्षणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसचे संजय पाटील दुधगावकर यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची चौरंगी लढत अपेक्षित आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आ. तथा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या विरोधात शिवसेनेने पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. भाजपाकडून माजी जिल्हाध्यक्ष संजय निंबाळकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे इच्छुक होते. मात्र, पक्षाने येथून रा. प. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना उमेदवारी दिल्याने येथेही लक्षवेधी लढत रंगणार आहे. महेंद्र धुरगुडे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात की बंडाचे निशाण फडकवितात, हे १ आॅक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष अमरराजे परमेश्वर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, शेकापच्या देवानंद रोचकरी यांना आयात करीत मनसेने त्यांना उमेदवारी बहाल केल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. एकूणच तुळजापूर मतदारसंघातही बहुरंगी लढत रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या उमरगा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान आ. ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधात काँग्रेसकडून जि. प. चे माजी सभापती किसन कांबळे, भाजपाकडून जि. प. सदस्य कैैलास शिंदे यांना मैदानात उतरविले आहे. डॉ. संजय गायकवाड हे काँग्रेसच्या तिकिटासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने स्थानिक उमेदवारच द्यावा, असा आग्रह उमरग्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धरल्यानंतर डॉ. गायकवाड यांचा पत्ता कापला गेला. त्यानंतर अखेरच्या क्षणी डॉ. संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळविली असून, उमरग्यातही चुरशीची लढत अपेक्षित आहे.
परंडा विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. राहुल मोटे यांच्या विरोधात शिवसेनेने माजी आ. ज्ञानेश्वर पाटील यांना पुन्हा रिंगणात उतरविल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा शिवसेनेशी थेट सामना रंगणार आहे. काँग्रेसकडून परंडा येथील अॅड. नुरोद्दीन चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली असून, भाजपाने येथे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पार्टीला जागा सोडली असून, रासपतर्फे बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर मैदानात उतरले आहेत. एकंदरीत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात अभूतपूर्व अशा चुरशीच्या लढती रंगणार असून नेमके चित्र १ आॅक्टोबर रोजी उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
‘आमचे बळ वाढले आहे, त्यामुळे जागाही वाढवून मिळायला पाहिजेत’, असे सांगत शिवसेना-भाजपासह काँग्रेस-राष्ट्रवादी मागील वीस दिवसांपासून भांडत होते. राज्य स्तरावरील नेत्यांच्या या म्हणण्याला त्यांचे स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारीही समर्थन देत होते. यातूनच सेना-भाजपाची २५ वर्षांपूर्वीची युती तुटली. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही काँग्रेससोबत असलेला पंधरा वर्षांचा संसार मोडला. शनिवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी यातील बहुतांश पक्षांचे पितळ उघडे पडले. उस्मानाबाद मतदारसंघासाठी भाजपाला पक्षातील एकही उमेदवार लायक वाटला नाही. त्यामुळेच पक्षाने येथून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांना काँग्रेसमधून आणून भाजपामध्ये पावन केले. तर उमरगा मतदारसंघात कालपर्यंत काँग्रेसच्या तिकिटासाठी फिल्डींग लावून बसलेल्या संजय गायकवाड यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. ‘नवा महाराष्ट्र घडविण्यासाठी साथ द्या’ असे सांगणाऱ्या मनसेलाही तुळजापुरात इतर पक्षातून उमेदवार आयात करावा लागला. तेथे शेतकरी कामगार पक्षाचे देवानंद रोचकरी यांनी मनसेच्या वतीनेही अर्ज दाखल केला आहे.