सरपंचाची निवड ३ एप्रिलला

By Admin | Updated: March 29, 2016 00:52 IST2016-03-29T00:06:04+5:302016-03-29T00:52:59+5:30

वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ३ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

The selection of the sarpanch will be held on April 3 | सरपंचाची निवड ३ एप्रिलला

सरपंचाची निवड ३ एप्रिलला


वाळूज महानगर : वडगाव-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाच्या निवडीसाठी ३ एप्रिल रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
साडेतीन महिन्यांपूर्वी १९ डिसेंबरला एकूण १७ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत विरोधकाला नामोहरम करून शिवसेनेने एकहाती सत्ता ताब्यात घेत १५ जागा मिळवून ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले होते. या निवडणुकीत भाजप व अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी एका जागेवर बाजी मारली होती. ग्रामपंचायतीची निवडणूक होऊनही मावळत्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ न संपल्यामुळे नवीन सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे जवळपास साडेतीन महिने ग्रामपंचायतीचा कारभार जुन्या पदाधिकाऱ्यांनीच सांभाळला. आता सरपंच व उपसरपंचपदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
राजकीय घडामोडींना वेग
सरपंचपदासाठी लॉबिंग केलेल्या इच्छुक पदाधिकाऱ्यांची धाकधूक वाढली असून सरपंच व उपसरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडावी, यासाठी इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सरपंचपद बजाजनगर तर वडगावला उपसरपंचपद मिळण्याची शक्यता असून या विषयी वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष आहे. तूर्तास प्रबळ दावेदार सदस्यांनी आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली असून सरपंचपद पटकावण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सरपंचपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असून उपसरपंचपदावर एससी प्रवर्गातील सदस्याची वर्णी लागण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे.
अनुभवी की नवखा? चुरस कायम...
यंदाच्या निवडणुकीत जवळपास सर्वच पदाधिकारी नवखे असून श्रीकृष्ण भोळे हे एकमेव सदस्य गेल्या तीन निवडणुकीत विजयी झालेले आहेत. त्यांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा अनुभव असून इतर सर्वच पदाधिकारी नवखे असल्यामुळे या मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार त्यांना पेलवेल का, अशी शंका काही राजकीय पदाधिकारी घेत आहेत. सध्या सरपंचपदासाठी महेश भोंडवे, सचिन गरड, श्रीकांत साळे, श्रीकृष्ण भोळे, रमाकांत भांगे तर उपसरपंचपदासाठी उषाबाई साळे, चंदाबाई काळे, हौसाबाई पाटोळे यांची नावे चर्चेत आहेत. खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची मर्जी राखणाऱ्या सदस्यांच्या गळ्यात सरपंच व उपसरपंचपदाची माळ पडणार असल्याची चर्चा वडगाव-बजाजनगरात सुरू आहे.

Web Title: The selection of the sarpanch will be held on April 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.