दिव्या धुळेची हवाई सफरीसाठी निवड
By Admin | Updated: July 9, 2014 00:51 IST2014-07-09T00:18:58+5:302014-07-09T00:51:25+5:30
औरंगाबाद : ‘लोकमत’च्या वतीने आयोजित संस्काराचे मोती स्पर्धेअंतर्गत शिवाजीनगर येथील गीता विद्यामंदिरची विद्यार्थिनी दिव्या भास्कर धुळे हिची हवाई सफरीसाठी निवड झाली आहे.

दिव्या धुळेची हवाई सफरीसाठी निवड
औरंगाबाद : ‘लोकमत’च्या वतीने आयोजित संस्काराचे मोती स्पर्धेअंतर्गत शिवाजीनगर येथील गीता विद्यामंदिरची विद्यार्थिनी दिव्या भास्कर धुळे हिची हवाई सफरीसाठी निवड झाली आहे. याबद्दल लोकमतच्या टीमने मंगळवारी शाळेत जाऊन तिचा सत्कार केला.
यावेळी व्यासपीठावर शाळेच्या मुख्याध्यापिका व्ही. बी. पवार, लोकमतचे ब्युरो चीफ शेख नजीर, वितरण व्यवस्थापक आलोक शर्मा आणि उपव्यवस्थापक सोमनाथ जाधव आदींची उपस्थिती होती. लोकमतच्या वतीने २०१३ मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी संस्काराचे मोती ही स्पर्धा घेतली. विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान मिळावे हा या स्पर्धेमागील उद्देश होता.
आॅक्टोेबर २०१३ मध्ये स्पर्धेत निवडून त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता याच स्पर्धेतील सहभागी शाळांमधून हवाई सफरीच्या विजेत्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे राज्यातून ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या सर्वांना विमानाने मुंबईहून दिल्लीची सफर घडविली जाणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातून शहरातील शिवाजीनगर येथील गीता विद्यामंदिर शाळेतील इयत्ता आठवीची विद्यार्थिनी दिव्या भास्कर धुळे हिची या हवाई सफरीसाठी निवड झाली आहे.
या निवडीबद्दल लोकमतच्या टीमने मंगळवारी गीता विद्यामंदिर शाळेत जाऊन तिचा सत्कार केला. याप्रसंगी सतीश भालेराव, प्रतीक गाडेकर, श्याम चोपडे, शिल्पा कुलकर्णी, दीपाली कुलकर्णी, वैष्णवी मोरे, ऋतुजा आहेर, अरुणा खंड या विद्यार्थ्यांनी संस्काराचे मोती या स्पर्धेसंदर्भातील एक नाटिका सादर केली.
त्यानंतर मुख्याध्यापिका व्ही. बी. पवार यांनी लोकमतच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर तर पडलीच; परंतु त्यासोबतच बक्षिसांचा लाभ झाल्याचे सांगितले. आलोक शर्मा म्हणाले, लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ३० लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी असंख्य विद्यार्थ्यांना विविध प्रकारची बक्षिसे देण्यात आली. त्यानंतर आता हवाई सफरीसाठी राज्यभरातून ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शेख नजीर यांनी गीता विद्यामंदिरच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष साळवे यांनी केले.
यावेळी वितरण प्रतिनिधी प्रताप शिरसाठ आणि वृत्तपत्र विक्रेते प्रकाश वाघ उपस्थित होते.
पंतप्रधानांना भेटण्याची संधी
लोकमतच्या संस्काराचे मोती या स्पर्धेत याआधीही विद्यार्थ्यांना मुंबई ते दिल्ली अशी हवाई सफर घडविण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत पोहोचल्यानंतर या विद्यार्थ्यांना तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना भेटण्याची संधी मिळाली होती. यावेळीही दिल्लीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेता येणार असल्याचे आलोक शर्मा यांनी सांगितले.
स्पोर्टस् बुक धमाल स्पर्धेचा लकी ड्रॉ
लोकमतच्या स्पोर्टस् बुक धमाल स्पर्धेचा लकी ड्रॉही यावेळी काढण्यात आला. त्यात सायली चोथमल हिला पहिले, सारंग जोशीला द्वितीय आणि सागर चव्हाण याला तृतीय बक्षीस मिळाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते त्यांना या बक्षिसांचे वाटप करण्यात आले.
विमानात बसण्याची इच्छा होती; पण ती इतक्या लवकर पूर्ण होईल असे वाटले नव्हते. लोकमतमुळे ती पूर्ण होत आहे.
- दिव्या धुळे, विद्यार्थिनी
विमानात बसण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मात्र, हा प्रवास महागडा असल्यामुळे ते शक्य होत नाही. लोकमतने विद्यार्थ्यांना ही संधी मिळवून दिली. त्यात आमच्या शाळेच्या विद्यार्थिनीची निवड झाली ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे.
- व्ही. बी. पवार, मुख्याध्यापिका, गीता विद्यामंदिर.