जप्त केलेल्या वाळूची वाहतूक करणारे टिप्पर, जेसीबी जप्त
By Admin | Updated: October 28, 2014 00:57 IST2014-10-27T23:53:59+5:302014-10-28T00:57:21+5:30
आष्टी : परतूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी साठविलेल्या वाळूचे पंचनामे करुन जप्त केलेल्या वाळूची चोरुन वाहतूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात

जप्त केलेल्या वाळूची वाहतूक करणारे टिप्पर, जेसीबी जप्त
आष्टी : परतूर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी साठविलेल्या वाळूचे पंचनामे करुन जप्त केलेल्या वाळूची चोरुन वाहतूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुध्द आष्टी पोलिस ठाण्यात महसूल विभागाच्या वतीने तलाठ्याने दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. एक टिप्पर, जेसीबी ताब्यात घेण्यात आला आहे.
जमादार एकनाथ पडूळ यांनी दिलेल्या माहितीनुसार गंगासावंगी ता. परतूर येथे गेल्या चार महिन्यापूर्वी एका गुत्तेदाराने अवैधरित्या साठविलेल्या गट क्र. १९० मध्ये मधील शेतातील ३२५ ब्रास वाळूचा पंचनामा करुन उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्या पथकाने वाळू जप्त केली होती; मात्र या वाळूची चोरुन विक्री झाली आहे. २७ आॅक्टोबर रोजी गोळेगाव सजाचे तलाठी जकीरोद्दीन म. अजिमोद्दीन यांना वाळू चोरट्या मार्गाने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावर त्यांनी या वाळुचा पंचनामा केला.
यात ५ ब्रास वाळू ज्याची किंमत २५००० रुपये व टिप्पर व जेसीबी असा एकूण ४० लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आष्टी पोलिस ठाण्यात टिप्पर (क्र.एमएच-२३-डब्ल्यू-२१८७), जेसीबी (क्र.एमएच-२३-टी-३०६) व टिप्पर चालक सहदेव महादेव कसबे रा. मंदा ता. वडवणी, जेसीबी चालक गजानन सखाराम वसावे तसेच मालक शिवाजी चाटे यांच्याविरुध्द कलम ३७९, ३४, ३ व ४ गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि हनुमंत उरलागुंडेवार हे करीत आहेत. (वार्ताहर)