शेतीच्या औजारांसह बियाणेही भस्मसात
By Admin | Updated: July 4, 2014 00:21 IST2014-07-03T23:49:44+5:302014-07-04T00:21:11+5:30
सवना : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुुर्द शिवारात शेतामधील गोठ्याला आग लागल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

शेतीच्या औजारांसह बियाणेही भस्मसात
सवना : सेनगाव तालुक्यातील चोंढी खुुर्द शिवारात शेतामधील गोठ्याला आग लागल्याची घटना २ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेमध्ये शेतीची औजारे, बी-बियाणे, वैरण जळाल्याने अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर मोठे नुकसान झाल्याने संबंधित शेतकऱ्यासमोर नवेच संकट निर्माण झाले आहे.
सवना येथील शेतकरी प्रल्हादअप्पा किसन रोहडकर यांची चोंढी शिवारातील गट क्र. ७२ मध्ये जवळपास १८ एकर शेतमजीन आहे. शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी भुुईमुगाचे साधारणत: १५ गाड्या काड (वाळलेल्या वेलांचा चारा), गवत व कुटार ठेवलेले होते. तसेच सध्या पेरणीचे दिवस असल्याने मागील महिनाभरापासून कृषी औजारे, बी-बियाणे खरेदी करून गोठ्यामध्ये झाकून ठेवले होते.
दरम्यान, बुधवारी रात्री ७.३० ते ८ वाजेदरम्यान प्रल्हादअप्पा रोहडकर यांच्या शेतातील गोठ्यास आग लागली. या आगीमध्ये २७ हजार रूपये किंमतीच्या सोयाबीन बियाणांच्या १० बॅग, १२ हजार ५०० रूपये किंमतीचे १ पोते गोदावरी डीएपी खत, पेट्रोलवर चालणारा फवारणी पंप व भुईमुगाचे काड असा एकूण ३५ हजाराचा माल, तसेच गवत, कुटार आणि तिफन, डवरे, वखर आदी औजारे व इतर असे ११ हजाराचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने ९० हजाराचे नुकसान झाले आहे.
सवना येथे पावसासाठी पंगतीचा कार्यक्रम असल्याने रोहडकर कुटुंबिय गावातच होते. त्याचवेळी गोठ्याला आग लागली.
याबाबत त्यांना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास माहिती मिळाली. त्यानंतर माधव कोरपडे, संतोष क्षीरसागर, दिनेश वानखेडे, लखन नायक आदी शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. सवना तलावातून पाणी आणून अडीच तासानंतर आग विझविण्यात यश आले. रात्रीची वेळ असल्याने वीज भारनियमनामुळे लाईट बंद होती. ग्रामस्थांच्या विनंतीवरून लाईनमनने वीजपुरवठा सुरळीत केल्यामुळे पाणी आणण्यासाठी सुविधा झाली.
३ जुलै रोजी सकाळी गोरेगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजमोहन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मुरलीधर मुंढे, पोना के. डी. राखुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. याबाबत प्रल्हादअप्पा रोडकर यांनी दिलेल्या अर्जावरून गोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मात जळितची नोंद करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी गोठ्यात दावणीला बांधलेले २ बैल सोडून देण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे कुणीतरी जनावरे सोडून देत गोठ्याला आग लावली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. परंतू रोडकर यांनी तशी तक्रार दिलेली नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)
गोठ्यास आग लागल्याने मोठी हानी
सेनगाव तालुक्यातील सवना येथील शेतकरी प्रल्हादअप्पा किसन रोहडकर यांची चोंढी शिवारात शेती आहे.
शेतातील गोठ्याला बुधवारी रात्री आग लागल्याने नुकसान झाले.
आगीमध्ये सोयाबीन बियाणांच्या १० बॅग, १ पोते डीएपी खत, पेट्रोल फवारणी पंप व भुईमुगाचे काड तसेच गवत, कुटार आणि तिफन, डवरे, वखर आदी औजारे व इतर साहित्य जळाले आहे.