साडेपाच लाखांचा मुद्देमाल गांजासह जप्त
By Admin | Updated: June 6, 2016 00:22 IST2016-06-06T00:15:16+5:302016-06-06T00:22:36+5:30
येणेगूर : कारमधून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना मुरूम पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास

साडेपाच लाखांचा मुद्देमाल गांजासह जप्त
येणेगूर : कारमधून अवैधरित्या गांजाची वाहतूक करणाऱ्या चौघांना मुरूम पोलिसांनी जेरबंद केले़ ही कारवाई शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास येणेगूर टोलनाक्याजवळ करण्यात आली़ यावेळी गांजासह तब्बल ५ लाख ३० हजार ४८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुरूम पोलीस ठाण्याचे सपोनि विलास गोबाडे, पोउपनि युवराज पोठरे, पोहेकॉ विजयानंद साखरे, पोना दिगंबर सूर्यवंशी, गोरख शिंदे, लक्ष्मण घुगे आदी कर्मचारी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येणेगूर टोलनाक्याजवळ बॅरेकेटींग करून वाहनांची तपासणी करीत होते़ त्यावेळी मुंबईहून हैद्राबादकडे जाणारी एक कार (क्ऱए़पी़०९-ए़एम़०७२७) ही पोलिसांनी अडविली़ पोना दिगंबर सूर्यवंशी यांना संशय आल्याने गाडीच्या कागदपत्रांची त्यांनी मागणी केली़ चालकाला पाठीमागील कारची डिक्की उघडण्यास सांगितल्यानंतर तो टाळाटाळ करू लागला़ पोलिसांचा संशय बळावल्याने चालकाला पोलिसी खाक्या दाखविण्यात आल्या़ त्यानंतर त्याने डिक्की उघडताच आमध्ये गांजा असल्याचे आढळून आले़ पोलिसांनी कारवाई करून चालक अहमद इसाक शेख, महंमद युनूस महमद याकूब शेख, तौफिक बशीर, अहमद शेख (सर्व रा़ जोगेश्वरी, मुंबई) यांना ताब्यात घेतले़पोलिसांनी ३४ किलो गांजा, कार, मोबाईल, रोख रक्कम असा जवळपास ५ लाख ३० हजार ४८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे़ दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळाला भेट देवून मार्गदर्शन केले़ याबाबत मुरूम पोलीस ठाण्यात एऩडी़पी़एस़अॅक्ट कलम २० (ब) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत खांडवी हे करीत आहेत़ (वार्ताहर)