बनावट खताचा साठा जप्त
By Admin | Updated: May 17, 2016 00:37 IST2016-05-17T00:24:30+5:302016-05-17T00:37:23+5:30
औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट खत विक्री करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

बनावट खताचा साठा जप्त
औरंगाबाद : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात शेतकऱ्यांना बनावट खत विक्री करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. कृषी विभागाच्या पथकाने कन्नड तालुक्यातील जामडी जहागीर येथे कारवाई करून अशा खताच्या तब्बल १२२ बॅग जप्त केल्या आहेत. या प्रकरणी उत्पादक, विक्रेता, वाहन मालक आदींविरुद्ध पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नामांकित कंपन्या बनावट बॅग तयार करून त्यातून हे खत शेतकऱ्यांना विकले जात होते.
विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने आणि जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. यावेळी विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, विभागीय गुणनियंत्रण अधिकारी भीमराव कुलकर्णी, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक एस. डी. धांडे आदींची उपस्थिती होती.
जामडी येथे अज्ञात व्यक्ती बनावट खते विक्री करीत असल्याची माहिती शुक्रवारी कृषी विकास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर लगेचच गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुदर्शन मामीडवार पथकासह जामडी येथे पोहोचले; परंतु तोपर्यंत बनावट खत उतरून टेम्पो परत गेले होते.
पथकाने शेतकऱ्यांकडून माहिती घेतली असता गावातील सुनील जैस्वाल आणि इतर शेतकऱ्यांकडे खत उतरविल्याची माहिती मिळाली. तोपर्यंत महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक धांडे आणि त्यांचे सहकारीही येथे दाखल झाले. त्यानंतर ज्या-ज्या शेतकऱ्यांनी खते घेतली आहेत, त्यांची घरी जाऊन पाहणी करण्यात आली. तेव्हा गबाजी लोखंडे यांच्या घरी १८:१८:१० च्या ४७ आणि युरियाच्या ५ बॅगा आढळून आल्या. या बॅग धनराज जैस्वाल यांच्याकडून खरेदी केल्याचे लोखंडे यांनी सांगितले. तपासणी केली असता या बोगस असल्याचे आढळून आले. या बॅगवर महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित फॅक्ट्री वर्धा असे लिहिलेले होते.
परंतु त्यावरील बॅच क्रमांक बोगस होते. पथकाने सुनील जैस्वाल यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी धनराज जैस्वाल आणि रामभैय्या जैस्वाल यांच्याकडून खत खरेदी केल्याचे सांगितले. त्यांनी उखा गुंजाळ यांच्या शेतातील घरी आणखी खत असल्याचे कबूल केले.
तेथे एकूण ७० बॅग आढळून आल्या. ही सर्व खते झुआरी, उज्वला युरिया निमकोटेड आदी कंपन्यांच्या बनावट बॅगमध्ये होती. तपासणीत ही सर्व खते प्रथमदर्शनी बनावट असल्याचे आणि त्यांच्या बॅगवरील बॅच क्रमांकही खोटे असल्याचे दिसून आले. त्यामुळे लगेचच या बॅग जप्त करून पंचायत समिती कन्नडमध्ये नेण्यात आल्या. त्यानंतर पिशोर पोलीस ठाण्यात आरोपी सुनील जैस्वाल, धनराज जैस्वाल (रा. जामडी), रामभैय्या जैस्वाल (रा. औराळा) यांच्यासह ज्या वाहनातून खत आणले त्या वाहनाचा मालक, अज्ञात वाहनचालक तसेच उत्पादक आदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.