मंगळसूत्र विकून बियाणांची खरेदी
By Admin | Updated: June 9, 2017 00:58 IST2017-06-09T00:56:09+5:302017-06-09T00:58:09+5:30
आष्टी : यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे.

मंगळसूत्र विकून बियाणांची खरेदी
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : यंदा वेळेवर पाऊस सुरू झाल्याने बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे. तालुक्यातील बीडसांगवी येथील महिलेने तर चक्क मंगळसूत्र मोडून बी-बियाणे खरेदी केले आहे.
लक्ष्मीबाई घुंबरे असे त्या महिलेचे नाव आहे. घुंबरे या आष्टी येथील सोनाराच्या दुकानात दोन पळ्या असलेले मंगळसूत्र व ११ वर्षाचा असलेला नातवाच्या कानातील बाळी घेऊन आल्या. हे सोने मोडून त्याचे चार हजार ९५० रुपये त्यांनी घेतले.
तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तिथे उपस्थित असलेल्या शिक्षक अमोल कदम यांनी अडचण विचारली. यावर त्यांनी त्यांच्या परिस्थितीचा लेखाजोखाच मांडला. लक्ष्मीबाई घुंबरे म्हणाल्या, मला पावणेदोन एकर जमीन आहे. यावर्षी पावसाने चांगली सुरूवात केल्याने यंदाची पेरणी वेळेवर होईल, अशी अपेक्षा आहे. परंतु बी-बियाणे खरेदीसाठी पैसे नाहीत. डोक्यावर अगोदरच बँकेचे कर्ज आहे. मग पुन्हा बँक दरवाजात उभा करणार नाही म्हणून तिकडे फिरकलेच नाही. सावकार दरवाजा उभा राहू देत नाही. कोणी हातउसने पैसे देत नाही. म्हणून मी मंगळसूत्र व नातवाच्या कानातली बाळी मोडून बी-बियाणे खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मी आज हे सोने विकले. यातून मला ४ हजार ९५० रुपये मिळाले आहेत, असे त्या म्हणाल्या.