अग्नीकांडाचे रहस्य गुलदस्त्यात
By Admin | Updated: September 18, 2014 00:40 IST2014-09-18T00:09:53+5:302014-09-18T00:40:52+5:30
अंबाजोगाई: येथील नवा मोंढा परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवजाची लूट केली तसेच दुकानांना आग लावून चोरटे फरार झाले.

अग्नीकांडाचे रहस्य गुलदस्त्यात
अंबाजोगाई: येथील नवा मोंढा परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी सहा दुकाने फोडून रोख रक्कम व ऐवजाची लूट केली तसेच दुकानांना आग लावून चोरटे फरार झाले. या आगीत सहा दुकाने भस्मसात झाली. नुकसानीचा आकडा सात लाखांवर जाऊन पोहचला आहे. ही आग कोणी व कशासाठी लावली? याचे रहस्य अजून उलगडले नसले तरी पोलिस यंत्रणा त्याचा शोध घेत आहेत. मात्र, कोट्यवधी रुपयांचे दररोज व्यवहार होणाऱ्या मोंढा बाजारपेठेत सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अनास्था आहे.
अंबाजोगाईची मुख्य बाजारपेठ असलेल्या नवा मोंढा हा परिसर सातत्याने चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या दोन वर्षांपासून मोंढा परिसरात लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने सुरूच आहेत. मोंढयातील ४० टक्के व्यापाऱ्यांना आजपर्यंत चोरी व दुकानफोडीचा सामना करावा लागला आहे.
मोंढा बाजारपेठेत दररोज कोट्यावधी रुपयांचे व्यवहार होतात. शहरातील सर्वच मोठ्या व्यापाऱ्यांची मोंढा परिसरात दुकाने व एजन्सीज् आहेत. अशी मोठी उलाढाल असतांनाही सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अनास्था आहे. संपूर्ण मोंढयात स्वत:चे सुरक्षारक्षक ठेवण्याची तसदी कुणीही घेत नाही.
परिणामी याचा मोठा फटका व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. अशा स्थितीत सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजना आखण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या आगीचे रहस्य अद्याप गुलदस्त्यात असले तरी याचा शोध पोलिस यंत्रणा घेत आहेत. (वार्ताहर)