माध्यमिक शिक्षकाच्या १९ जागा होणार रद्द
By Admin | Updated: November 3, 2016 23:53 IST2016-11-03T23:48:09+5:302016-11-03T23:53:18+5:30
उस्मानाबाद : शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त गुरूजींचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आॅनलाईन समायोजन करण्यात आले आहे.

माध्यमिक शिक्षकाच्या १९ जागा होणार रद्द
उस्मानाबाद : शासनाच्या निर्देशानुसार अतिरिक्त गुरूजींचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने आॅनलाईन समायोजन करण्यात आले आहे. त्यांच्या मागणीनुसार शाळाही देण्यात आल्या. परंतु, आजवर ३२ पैकी केवळ १३ शाळांनीच गुरूजींना रूजू करून घेतले आहे. त्यामुळे संबंधित शाळांतील शिक्षकांची १९ पदे रद्द केली जाणार आहेत. यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
जिल्हाभरात सध्या अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा अशा अतिरिक्त माध्यमिक शिक्षकांच्या समायोजनासाठी पहिल्यांदाच आॅनलाईन पद्धत अवलंबिण्यात आली. रिक्त पदे आणि अतिरिक्त शिक्षकांची सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाभरात तब्बल ८३ शिक्षक अतिरिक्त असल्याचे समोर आले होते. या शिक्षकांच्या समायोजनासाठी १४ सप्टेंबर रोजी समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती. सदरील प्रक्रियेदरम्यान ८३ पैकी केवळ ३२ गुरूजींचे समायोजन करण्यात आले. संबंधित शिक्षकांना आॅनलाईन पद्धतीने नियुक्ती आदेशही देण्यात आले.
सदरील कार्यवाहीनंतर त्या-त्या शिक्षकांना ताडीने रूजू करून घेणे बंधनकाकर होते. परंतु, जवळपास दीड ते दोन महिने संबंधित शिक्षकांनी शिक्षण संस्थांकडे रूजू करून घेण्यासाठी खेटे मारूनही २७ आॅक्टोबरपर्यंत केवळ दहाच गुरूजींना रूजू करून घेण्यात आले होते. त्यावर शिक्षण विभागाकडून जवळपास २२ शिक्षण संस्थांना नोटीस देवून शिक्षकांना रूजू करून घ्या, अन्यथा रिक्त जागा व्यपगत केल्या जातील, असा इशारा दिला होता.
यासाठी ३० आॅक्टोंबर ही डेडलाईन देण्यात आली होती. सदरील कालावधीत २२ पैकी केवळ ३ शिक्षकांना रूजू करून घेतले आहे. दरम्यान, वारंवार नोटिसा, सूचना देवूनही १९ गुरूजींना रूजू न करून घेतल्याने आता शिक्षण विभागाकडून थेट शिक्षकांची संबंधित रिक्त पदे रद्द (व्यपगत) करण्याची प्रक्रीया सुरू केली आहे. सदरील कारवाईमुळे संस्थाचालकांचे धाबे दणाणले आहेत. (प्रतिनिधी)