डेंग्यूसदृश्य तापाचा दुसरा बळी
By Admin | Updated: September 1, 2014 01:06 IST2014-09-01T00:40:31+5:302014-09-01T01:06:51+5:30
फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगी गेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने

डेंग्यूसदृश्य तापाचा दुसरा बळी
फकिरा देशमुख/बाळू मोकासरे , भोकरदन/वालसावंगी
गेल्या आठ-दहा दिवसांपासून भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात डेंग्यूसदृश्य तापाने थैमान घातले असून आतापर्यंत डेंग्यूसदृश्य तापाने भाऊ-बहिणीचा बळी गेल्याने गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. मात्र दुसरीकडे आरोग्य विभाग बेफिकिर असून अद्यापही या गावात पथक दाखल झालेले नाही.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून गावात तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत २५-३० रुग्ण तापाने फणफणत आहेत. २१ आॅगस्ट रोजी निवृत्ती उर्फ राजेंद्र भालचंद्र गावंडे (वय ५) यास तापामुळे बुलढाणा येथील रुग्णालयातून औरंगाबाद येथे अधिक उपचारासाठी नेण्यात येत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर ३१ आॅगस्ट रोजी निवृत्तीची बहिण अश्विनी भालचंद्र गावंडे (वय ७ वर्षे) हिचाही डेंग्यूसदृश्य तापाने औरंगाबाद येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मात्र या प्रकारानंतरही आरोग्य विभागाच्या स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तात्पुरत्या स्वरूपाचे उपचार केले जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
गावातील एका हातपंपास दूषित पाणी असल्याने काही जणांना ताप आल्याचा दावा आरोग्य विभागातर्फे केला जात आहे.
गावात डासांचे प्रमाण वाढल्याने धूर फवारणी करणे आवश्यक आहे. आरोग्य पथक अद्याप गावात दाखल झालेले नाही. मात्र गावात तापाचे रुग्ण वाढत असून परिणामी ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पद्मावती हे पुनर्वसित गाव तलावाच्या काठावर आहे. सध्या पावसाळा असल्याने गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे तापाची लागण सुरू झाली आहे. हा ताप डेंग्यूसदृश्य असल्याचा संशय ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यास दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, गावात आणखी २५-३० रुग्ण तापाने फणफणले असून आरोग्य विभागाने अद्यापही सतर्कता दाखविलेली नाही, असे सरपंच रमेश तराळ, कल्याण तराळ यांनी सांगितले.
याबाबत वैद्यकीय अधिकारी अनिल वाघमारे म्हणाले, या भावंडांचा मृत्यू तापाने झाला. त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहे. त्यामुळे ताप कोणत्या प्रकारचा आहे, हे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.
मयत मुलांचे वडील भालचंद्र गावंडे हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना अश्विनी व निवृत्ती ही दोनच अपत्ये होती. दोन अपत्यांवर त्यांनी नसबंदी करून घेतली होती. मात्र या दोन्ही अपत्यांचा तापाच्या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा संसार कोलमडल्यासारखा झाला आहे. या प्रकारामुळे गावातही शोककळा पसरली आहे.
४गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पद्मावती गावातील रोहित्र वारंवार जळाल्याने सध्या गाव अंधारात आहे. अंधारामुळेच गेल्या आठवड्यात एका वृद्धाचा साप चावून मृत्यू झाला. मात्र या पार्श्वभूमीवर महावितरणने गावात नवीन रोहित्र बसविलेले नाही.