सलग दुसऱ्या दिवशी दुचाकीस्वार चोरट्यांनी वृद्धेचे सोन्याचे गंठण हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:25+5:302021-07-07T04:06:25+5:30
विमल दत्तात्रय वाणी (वय ७०) या कुटुंबासह नवभारत हौसिंग सोसायटीत राहतात. त्यांच्या मुलाचे टायपिंग सेंटर आहे. ६ जुलै ...

सलग दुसऱ्या दिवशी दुचाकीस्वार चोरट्यांनी वृद्धेचे सोन्याचे गंठण हिसकावले
विमल दत्तात्रय वाणी (वय ७०) या कुटुंबासह नवभारत हौसिंग सोसायटीत राहतात. त्यांच्या मुलाचे टायपिंग सेंटर आहे. ६ जुलै रोजी दुपारी १.१० वाजेच्या सुमारास त्या घरासमोर वाळविण्यासाठी टाकलेले कपडे पलटवत होत्या. याचवेळी रंजनवन हौसिंग सोसायटीकडून मोटारसायकलस्वार अनोळखी दोन तरुण त्यांच्या घरासमोर आले. त्यांनी रस्त्यावर दुचाकी उभी केली आणि एकजण दुचाकीवरून उतरून त्यांच्याजवळ आला. त्यांच्या हातात चिठ्ठी देऊन या चिठ्ठीवरील पत्ता सांगा, असे तो म्हणाला. यामुळे विमल या त्यांचा नातू सुयश याला आवाज देत असताना त्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण हिसकावून तोडून घेतले. यानंतर चोरटा पळत जाऊन साथीदाराच्या मोटारसायकलवर बसला आणि ते वेगात निघून गेले. यावेळी विमल यांनी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. या घटनेची माहिती त्यांनी सिडको पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक अशोक गिरी, गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याविषयी विमल यांच्या तक्रारीवरुन सिडको ठाण्यात मंगळसूत्र चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.
चौकट
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
विमल वाणी यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे सोन्याचे गंठण हिसकावून नेणारे चाेरटे त्यांच्या घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. आरोपींच्या वर्णनावरून पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.