दुसऱ्या पसंतीच्या मतांची ‘लेन-देन’
By Admin | Updated: June 19, 2014 00:52 IST2014-06-19T00:44:03+5:302014-06-19T00:52:50+5:30
औरंगाबाद : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दलित, मुस्लिमांच्या मतांवर सत्ता उपभोगली; परंतु सत्तेचे फायदे या दोन्ही समाजघटकांपर्यंत पोहोचू दिले नाहीत.

दुसऱ्या पसंतीच्या मतांची ‘लेन-देन’
औरंगाबाद : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने दलित, मुस्लिमांच्या मतांवर सत्ता उपभोगली; परंतु सत्तेचे फायदे या दोन्ही समाजघटकांपर्यंत पोहोचू दिले नाहीत. त्यामुळे विद्यमान पदवीधर मतदारसंघात दलित व अल्पसंख्याकांनी दुसऱ्या पसंतीच्या मतांची देवाण-घेवाण करावी, असे आवाहन बहुजन, मागासवर्गीय प्राध्यापक, अधिकारी, अल्पसंख्याक कर्मचारी महासंघ पुरस्कृत उमेदवार डॉ. शंकर अंभोरे व एमआयएमचे (मजलीस-ए -इत्तेहादुल मुसलीमीन) उमेदवार अॅड. मुश्ताक अहमद खान यांनी बुधवारी येथे आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत केले.
मतदारसंघातील विद्यमान लोकप्रतिनिधीने या दोन्ही समाजघटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी विधान परिषदेत एकही प्रश्न उपस्थित केला नाही, असा दावाही या दोन्ही उमेदवारांनी केला. त्यामुळे दोन्ही समाजघटकांनी त्यांची पहिल्या पसंतीची मते त्यांच्या उमेदवारांना द्यावीत व दुसऱ्या पसंतीची मते एकमेकांना द्यावीत, असे आवाहनही दोघांनी केले. एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष सय्यद मोईन म्हणाले की, अल्पसंख्याक व दलितांच्या मतांवर काँग्रेसचे सरकार येते. परंतु गेल्या ६० वर्षांत काँग्रेसने अल्पसंख्याकांच्या शिक्षणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. हा समाज प्रत्येक क्षेत्रात आता मागे पडला आहे. त्यामुळे आता दलित व अल्पसंख्याकांनी आपल्या उद्धाराचा मार्ग स्वत:च निवडला पाहिजे.
पत्रकार परिषदेला प्रा. किशोर साळवे, जावेद कुरैशी, अरुण शिरसाठ, संजय पाईकराव, कुणाल खरात, प्रा. किशोर वाघ आदींची उपस्थिती होती.