टंचाई परिस्थितीवर शिक्कामोर्तब
By Admin | Updated: August 20, 2014 00:21 IST2014-08-19T23:42:59+5:302014-08-20T00:21:54+5:30
परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

टंचाई परिस्थितीवर शिक्कामोर्तब
परभणी : जिल्ह्यात सद्य स्थितीत केवळ १७.१५ टक्के सरासरी पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत. चिंतेत सापडलेल्या बळीराजाला दिलासा मिळावा, या उद्देशाने राज्य शासनाने गेल्या आठवड्यात राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर केली होती. त्यामध्ये जिल्ह्यातील नऊही तालुक्यांचा समावेश असल्याचा आदेश १९ आॅगस्ट रोजी महसूल विभागाच्या वतीने काढण्यात आला आहे.
मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत परभणी जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान कमीच आहे. असे असताना यावर्षी समाधानकारक पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. जिल्ह्याचे जून ते आॅक्टोबर या कालावधीतील सरासरी पर्जन्यमान ७६४.५९ मि.मी. आहे. आजपर्यंत ४७०.४ मि.मी. पाऊस झाला असून जिल्ह्याची वार्षिक सरासरीची टक्केवारी केवळ १७.१५ टक्के झाली आहे. समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील ३ लाख ९७ हजार हेक्टरवर पेरलेली पिके धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिके पिवळी पडली असून चांगला पाऊस न झाल्यास ही पिके वाचविणे कठीण जाणार आहे.
संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्याच्या उद्देशाने गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यातील १२३ तालुके टंचाईग्रस्त जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे ९ तालुके येतात की नाही, या विषयी जिल्हावासियांना शंका वाटत होती.
अखेर या संदर्भातील महसूल विभागाचा आदेश १९ आॅगस्ट रोजी निघाला. त्यामध्ये जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, पाथरी, जिंतूर, पूर्णा, पालम, सेलू, सोनपेठ, मानवत या सर्वच तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे या सर्व तालुक्यांमधील बळीराजाला एक प्रकारे दिलासा मिळणार आहे. ( जिल्हा प्रतिनिधी)