परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !
By Admin | Updated: March 27, 2015 00:25 IST2015-03-27T00:25:16+5:302015-03-27T00:25:16+5:30
बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे

परीक्षेआधीच संपणार वसतिगृहांचा ‘हंगाम’ !
बीड : ऊसतोडी व विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी असतानाच हंगामी वसतिगृहांचा ‘हंगाम’ ३१ मार्च रोजी संपणार आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या २४ हजारांहून अधिक पाल्यांना याचा फटका बसणार आहे. उल्लेखनीय हे की, वसतिगृहे आधीच एक महिना उशिराने सुरू झालेली आहेत.
जिल्ह्यात ऊसतोड कामगारांची २४ हजार ७४० इतकी मुले ४८१ हंगामी वसतिगृहांमध्ये शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहांत शिक्षणासोबतच निवासाची व जेवणाची सोय करण्यात आली आहे. १ आॅक्टोबर ते ३१ मार्च या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, दिवाळीनंतर ऊसतोड कामगारांना विविध मागण्यांसाठी संपाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे आॅक्टोबर महिना उलटल्यानंतर एकही वसतिगृह सुरू होऊ शकले नव्हते. महिनाभर उशिराने सुरू झालेली वसतिगृहे आता ३१ मार्च रोजी बंद करण्याचे आदेश राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
वसतिगृहांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. त्यांच्या परीक्षा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. एप्रिल महिन्यात परीक्षा होणार आहेत. मात्र परीक्षांपूर्वीच वसतिगृहांना टाळे लागणार असल्यामुळे ऊसतोड कामगारांच्या पाल्यांचा आधार हरवणार आहे. वसतिगृहे महिनाभर उशिराने सुरू झाली. त्यामुळे आणखी महिनाभर मुदतवाढ मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप शिक्षण विभागाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत. याउलट गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र धाडून वसतिगृहे ३१ मार्च रोजी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
विद्यार्थ्यामागे आठ हजारावर खर्च
वसतिगृहाची जबाबदारी मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीवर आहे. प्रति विद्यार्थी ८२०० रूपये इतका खर्च सहा महिन्यात होतो. हंगामी वसतिगृहात कमीत कमी २० विद्यार्थी असणे आवश्यक आहेत.
दरम्यान, जिल्ह्यासाठी १९ कोटी ८२ लाख ९२ हजार रूपये इतका निधी मंजूर आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ७ कोटी ४८ लाख ७८ हजार ६५६ रूपये इतका निधी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे वसतिगृह चालकांची उसनवारी सुरू आहे. निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड म्हणाले. (प्रतिनिधी)
फेब्रुवारीमध्ये १४८ केंद्रप्रमुख, ९ विस्तार अधिकारी व ५ अधिकाऱ्यांमार्फत वसतिगृहांची तपासणी झाली. त्यात २४ हजार ७४० विद्यार्थी आढळून आले. आढळलेल्या विद्यार्थी संख्येनुसार अनुदान वाटप करण्याच्या सूचना सीईओ नामदवे ननावरे यांनी दिल्या.
परीक्षा बाकी असल्या तरी शासनाने ३१ मार्च रोजी वसतिगृहे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
- सुखदेव सानप, शिक्षणाधिकारी (प्रा.)
परीक्षा होणे बाकी असल्यामुळे हंगामी वसतिगृहांना मुदतवाढ द्यावी, अशी शिफारस एकाही गटशिक्षणाधिकाऱ्याने केली नाही. शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांनीही तसदी घेतलेली नाही.