नवीन जागेचा शोध थांबला...!
By Admin | Updated: October 13, 2014 00:34 IST2014-10-13T00:26:59+5:302014-10-13T00:34:34+5:30
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून गेल्या वर्षभरापासून नव्या जागेचा शोध घेतला जात आहे;

नवीन जागेचा शोध थांबला...!
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाकडून गेल्या वर्षभरापासून नव्या जागेचा शोध घेतला जात आहे; परंतु राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आगामी काळात बंद होणार असल्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्र्यांनी आॅगस्ट महिन्यात दिले. यामुळे आरटीओ कार्यालयासाठी नव्या जागेचा शोध थांबविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात येणाऱ्या वाहनांची संख्याही वाढली आहे. कार्यालयात दररोज येणारी वाहने आणि जप्त केलेली अवजड वाहने उभी करण्यास जागा अपुरी पडत आहे. पुरेशा जागेअभावी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली जाते, त्या ट्रॅकजवळ अवजड वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे येणाऱ्या विविध अडचणी लक्षात घेऊन गेल्या वर्षभरापासून कार्यालयासाठी जागेचा शोध घेण्यात आला. यामध्ये पाहण्यात
आलेल्या जागा मिळण्यास अडचणी आल्याने जागेचा शोध सुरूच
राहिला.
दरम्यान, आॅगस्ट महिन्यात आरटीओ कार्यालयात फक्त लक्ष्मीदर्शनाचा खेळ चालतो अशी टीका करीत आरटीओऐवजी अत्याधुनिक तंत्राचा आधार घेऊन दुसरी प्रभावी यंत्रणा सुरू करण्याचे संकेत केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे आरटीओऐवजी सुरू होणाऱ्या नवीन व्यवस्थेबाबत उत्सुकता वाढली आहे. अशा परिस्थितीत आरटीओ कार्यालयासाठी नव्या जागेचा शोधही थांबविण्यात आल्याचे दिसत आहे. याविषयी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता काळानुरूप बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.