गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध उद्योग करणाऱ्यांचा शोध सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:13 IST2019-01-30T23:12:55+5:302019-01-30T23:13:18+5:30
औरंगाबाद : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ करणाºयांचा अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. औषध प्रशासनाबरोबर आरोग्य ...

गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध उद्योग करणाऱ्यांचा शोध सुरू
औरंगाबाद : गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध ‘उद्योग’ करणाºयांचा अखेर अन्न व औषध प्रशासनाकडून शोध घेण्यात येत आहे. औषध प्रशासनाबरोबर आरोग्य विभागाने जिल्ह्यात पडताळणी सुरू केली आहे.
जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांचा अवैध विक्रीचा ‘उद्योग’ सुरू आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेतल्याने अतिरक्तस्राव आणि अर्धवट गर्भपात होण्याचे प्रकार होत आहेत. हा प्रकार ‘लोकमत’ने २९ जानेवारी रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित करून समोर आणला. वृत्ताच्या दुसºयाच दिवशी गर्भलिंग निदान करणाºया डॉक्टरांच्या टोळीकडेही गर्भपाताच्या गोळ्या सापडल्या आहेत.
चारशे ते पाचशे रुपये किंमत असलेल्या गर्भपाताच्या गोळ्या अक्षरश: दीड ते दोन हजारांपर्यंत सर्रास विकल्या जात आहेत. ग्रामीण भागासह शहरी भागातही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या उपलब्ध करून देणारे सक्रिय आहेत; परंतु त्यांच्यापर्यंत आरोग्य विभाग पोहोचत नसल्याने हा ‘धंदा’ जोरात सुरू असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गर्भपाताच्या गोळ्यांची सर्रास अवैध विक्री होत असताना औषध प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याची ओरड जनसामान्यांतून होत होती. या प्रकारावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले आहे. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची विक्री करणाºयांवर नियमितपणे कारवाई केली जाते. यापुढेही बेकायदेशीररीत्या विक्री करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे औषध प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे म्हणाले की, गर्भपाताच्या गोळ्यांसंदर्भात जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. त्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत.
कारवाई करणार
गर्भपाताच्या गोळ्या जप्त केल्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय गोळ्या देणाºयांवर कारवाई केली जाते. यापूर्वी अशा कारवाया केलेल्या आहेत. आताही अवैधरीत्या गोळ्यांची विक्री करणाºयांचा शोध घेऊन कारवाई केली जाईल. कोणीही अवैध विक्री करीत असल्याची माहिती असल्यास नागरिकांनीही माहिती द्यावी.
-संजय काळे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषध)