सीमोल्लंघन
By Admin | Updated: October 12, 2016 01:18 IST2016-10-12T01:01:00+5:302016-10-12T01:18:32+5:30
दसऱ्यानिमित्त उसळलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठत मंगळवारी कर्णपुरा येथील कर्णिकादेवी तथा शहराचे ग्रामदैवत

सीमोल्लंघन
औरंगाबाद : दसऱ्यानिमित्त उसळलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठत मंगळवारी कर्णपुरा येथील कर्णिकादेवी तथा शहराचे ग्रामदैवत तुळजाभवानी मंदिरात पूजा होऊन नवरात्रोत्सवाचा समारोप झाला. त्यानंतर ‘गोविंदा, गोविंदा’च्या जयघोषात निघालेल्या बालाजीच्या रथयात्रेत सहभागी होत भगवंतांचा रथ ओढून भाविक कृतकृत्य झाले.
कर्णपुरा येथील कर्णिकादेवीचे लाखो भाविकांनी भक्तिभावे दर्शन घेऊन नवरात्रोत्सव साजरा केला. मंगळवारी शेवटच्या माळेला विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जिल्हाधिकारी डॉ. निधी पांडे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त खुशालचंद बाहेती आदी मान्यवरांच्या हस्ते श्री तुळजाभवानी मंदिरात आरती होऊन नवरात्रोत्सवाचा समारोप झाला. पुजारी सुरेश दानवे, संतोष दानवे आणि अंकुश दानवे आणि बाळू दानवे यांनी पौराहित्य केले.
तुळजाभवानीच्या आरतीनंतर श्री बालाजी मंदिर व रथावर हरिभाऊ बागडे व मान्यवरांच्या हस्ते आरती झाली. यावेळी अशोक पुजारी, अनिल पुजारी आणि जया पुजारी यांनी पौराहित्य केले.यानंतर भगवंतांच्या मूर्ती सजविलेल्या रथात ठेवण्यात आल्या. बागडे यांनी प्रथम रथ ओढून रथयात्रेस प्रारंभ केला. रथाच्या वरच्या मजल्यावर भगवंतांच्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे भाविकांना भगवंतांचे दर्शन घेता येत होते. ८० वर्षांपेक्षा अधिक जुना हा लाकडी रथ आहे. रथावर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. पद्मपुरा परिसरातील १०० पेक्षा अधिक युवक रथ ओढत होते. ढोलताशाचा गजर होता. प्रचंड गर्दीतून मार्ग काढीत रथ पुढे सरकत होता. पंचमुखी मारुती मंदिरासमोर रथ आकाशपाळणाच्या विद्युत रोषणाईत आणखी उजळून निघाला. रथ जेव्हा पंचवटी चौकात आला. तेव्हा महावीर उड्डाणपुलावर शेकडो भाविक उभे राहून तेथून हा नेत्रदीपक सोहळा पाहत होते. रथ चौकात येताच तेथे भगवंतांची आरती करण्यात आली आणि औरंगाबादकरांनी सीमोल्लंघन केल्याचा आनंदोत्सव साजरा केला. यानंतर पुन्हा रथ कर्णपुरा मंदिराच्या दिशेने निघाला. रथयात्रा बालाजी मंदिरात पोहोचली. तेथे आरती होऊन रथयात्रेचा समारोप झाला.