मनपा ठोकणार गाळ्यांना सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:18 IST2017-08-13T00:18:50+5:302017-08-13T00:18:50+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे.

मनपा ठोकणार गाळ्यांना सील
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार मनपा प्रशासन शहरातील ३०० गाळ्यांना पोलीस बंदोबस्तात सील ठोकणार आहे. गुरुवार १७ आॅगस्टपासून ही कारवाई सुरू होणार असून, २१ आॅगस्ट रोजी कारवाईचा अहवाल खंडपीठात सादर करण्यात येणार आहे. ज्या व्यापाºयांच्या गाळ्यांना सील ठोकायचे आहे, त्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
शहरात महापालिकेच्या मालकीचे २० पेक्षा अधिक व्यापारी संकुल आहेत. मागील ३० वर्षांमध्ये मनपाने कोट्यवधी रुपयांच्या या संकुलांकडे अजिबात लक्ष दिले नाही. मनपाच्या गाळ्यांमध्ये कोणते भाडेकरू आहेत, ते दरवर्षी करारानुसार भाडे भरतात किंवा नाही, अनधिकृतपणे या गाळ्यांमध्ये कोणी ठाण मांडले हेसुद्धा पाहण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. २००८ मध्ये मनपाच्या गाळ्यांसंदर्भात खंडपीठात सुमोटो याचिका (क्रमांक- ६९८९) दाखल झाली. या याचिकेच्या वेळोवेळी सुनावण्या झाल्या. प्रत्येक सुनावणीच्या वेळी मनपाने एक नवीन शपथपत्र दाखल करून वेळकाढू धोरण स्वीकारले. खंडपीठाच्या ही बाब निदर्शनास येताच मागील महिन्यात खंडपीठाने थेट ३०० गाळेधारकांवर कारवाई करा, असे आदेश ४ जुलै २०१७ रोजी न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. मंगेश पाटील यांच्या खंडपीठाने दिले. कारवाईचा अहवाल खंडपीठाला सादर करा, अशी तंबीही मनपाला दिली. खंडपीठाच्या आदेशाने मनपा प्रशासन चांगलेच हादरले. मागील एक महिन्यापासून जुन्या फायली शोधण्यात येत होत्या. सर्व गाळेधारकांच्या फायली शोधून ३०० गाळेधारकांची यादी तयार करण्यात आली. वर्षानुवर्षे पैसे न भरणाºया, करार संपलेल्या, अनधिकृतपणे गाळे बळकावून व्यवसाय करणाºयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गुरुवार १७ आॅगस्टपासून मनपा गाळे सील करणार आहे. या कामासाठी मोठा पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे. मागील एक महिन्यापासून मनपाच्या मालमत्ता विभागाकडे गाळेधारकांनी पैसे भरण्यासाठी अक्षरश: रांग लावली आहे. मनपा संबंधितांकडून जुनी थकबाकीही भरून घेत आहे.