सोयाबीन बियाणांच्या २२९ बॅगा सील
By Admin | Updated: July 24, 2014 00:28 IST2014-07-24T00:02:29+5:302014-07-24T00:28:01+5:30
हिंगोली : बीजोत्पादन कार्यक्रम न घेता दोन कंपनीच्या नावाने विक्री होत असलेल्या बनावट सोयाबीनचे बियाणे तपासणीअंती उघडकीस आले.
सोयाबीन बियाणांच्या २२९ बॅगा सील
हिंगोली : बीजोत्पादन कार्यक्रम न घेता दोन कंपनीच्या नावाने विक्री होत असलेल्या बनावट सोयाबीनचे बियाणे तपासणीअंती उघडकीस आले. बुधवारी सायंकाळी केलेल्या या कारवाईत २२९ बॅगांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने सील ठोकले. शिवाय या बियाण्यांचे नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीस पाठविले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी दिली.
बीजोत्पादनाचा कार्यक्रम न करता सागर अॅग्रो इन फुडस् आणि अनमोल सिड्स या कंपनीच्या नावाने सोयाबीनचे बियाणे विकले जात होते. दोन्ही कंपन्यांच्या नावाची पॅकिंंग करून बनावट बियाणे सर्रास विकले जात होते. त्यासंबंधीच्या तक्ररी आल्यामुळे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात या कंपनीचे बियाणे पकडून त्याची विक्री थांबविण्यात आली होती. बुधवारी त्या धरतीवर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शहरातील बालाजी कृषी केंद्राची सायंकाळी तपासणी केली.
त्यात सागर अॅग्रो इन फुडस् आणि अनमोल कंपनीच्या बियाण्यांच्या ४५० बॅगा विक्रीसाठी आणल्याचे अधिकाऱ्यांना समजले. यापूर्वी त्यातील १२१ बॅगा विक्री झाल्या असून सध्या २२९ बॅगा शिल्लक असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. तात्काळ गुणवत्ता निरीक्षक उत्तम वाघमारे आणि कपाळे यांनी शिल्लक बॅगांमधील बियाण्याचे नमूने काढून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले.
उर्वरित सर्व बॅगांना सील मारल्याची माहिती संजय नाब्दे यांनी दिली. (प्रतिनिधी)