दगडफेकीने गालबोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 21:26 IST2017-04-15T21:26:17+5:302017-04-15T21:26:59+5:30
अंबाजोगाई/ परळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला दगडफेकीच्या घटनांनी अंबाजोगाई व परळीत गालबोट लागले.

दगडफेकीने गालबोट
अंबाजोगाई/ परळी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला दगडफेकीच्या घटनांनी अंबाजोगाई व परळीत गालबोट लागले. दोन्ही ठिकाणी पोलिसांनी डीेजे वाजविण्यास विरोध केल्याने ही घटना घडली. सहायक अधीक्षक विशाल आनंद किरकोळ जखमी झाले तर दोन अधिकाऱ्यांसह चार कर्मचाऱ्यांना दुखापत झाली.
अंबाजोगाईतील मोंढा परिसरात शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता मिरवणुकीत डॉल्बी सिस्टिमचा वापर केला होता. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन झाल्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली आणि बीडहून बंदोबस्तासाठी आलेले पोलिस निरीक्षक श्रीकांत हरगबाळ यांना घेराव घातला. शहर ठाण्याचे सहायक निरीक्षक माजिद शेख यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महिला पोलिस कर्मचारी छाया वाघमारे यांच्यासमवेत हरगबाळ यांना घेरावातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांच्या दिशेने जमावाने दगड भिरकावले. यात श्रीकांत हरगबाळ, माजिद शेख या दोन अधिकाऱ्यांसह छाया वाघमारे जखमी झाल्या. शेख यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी लाठीमार केला. यात आठ जण जखमी झाले.
दरम्यान, पोलिसांनीच महिला, पुरूष आणि बालकांवर लाठीहल्ला केल्याचा आरोप करत संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जमावाने ठाण्यात ठिय्या दिला होता. अखेर अप्पर अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी चौकशीअंती कारवाईचे ठोस आश्वासन दिल्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास जमाव पांगला. आजवर शहरात जयंती मिरवणुकीत अनुचित प्रकार घडला नव्हता; परंतु या घटनेने शहरात रात्रभर तणावाचे वातावरण होते.
परळी शहरातील रोडे चौकात ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी डीजे सिस्टिमसह वाहन जप्त केले. त्यानंतर जमाव संतप्त झाला. मिरवणूक संपल्यानंतर पहाटे अडीच वाजता ६० ते ७० जण रोडे चौकात उभे होते. राज्य राखीव दलाचे जवान विलास बधू चव्हाण यांनी त्यांना हटकले. तेव्हा आमचा डीजे ठाण्यात का नेला? असे म्हणत त्यांनी दगडफेकीला सुरुवात केली. अंबाजोगाईचे सहायक अधीक्षक विशाल आनंद हे जीपमधून खाली उतरून त्यांना समजावण्यास गेले तेव्हा पाठीमागून त्यांच्या दिशेनेही दगड भिरकावण्या आला. तो त्यांच्या पाठीत लागल्याने विशाल आनंद किरकोळ जखमी झाले. या दगडफेकीत राज्य राखीव दलाचे जवान विलास चव्हाण, पोकॉ आकाश राऊत, नितीन आतकरे हे जखमी झाले. त्यानंतर तेथे जादा पोलीस कुमक मागविण्यात आली. यावेळी जमाव पांगला. याप्रकरणी रवी मुळे, अल्ताफ पठाण, काळू भद्रे, मुन्ना रोडे, पोपट साळवे यांच्यासह १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. (वार्ताहर)