विधानसभेसाठी इच्छुकांची चाचपणी
By Admin | Updated: June 11, 2014 00:34 IST2014-06-11T00:16:30+5:302014-06-11T00:34:17+5:30
दिलीप सारडा , बदनापूर विधानसभा मतदारसंघात आता विधानसभेची लगबग सुरू झाली असून, अनेक इच्छुक आपापल्या परीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी चाचपणी करीत आहेत.

विधानसभेसाठी इच्छुकांची चाचपणी
दिलीप सारडा , बदनापूर
विधानसभा मतदारसंघात आता विधानसभेची लगबग सुरू झाली असून, अनेक इच्छुक आपापल्या परीने निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी चाचपणी करीत आहेत.
लोकसभेची निवडणूक संपली. पाठोपाठ विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. हा विधानसभा मतदारसंघ इच्छुकांना सोपा वाटत असला तरी भल्याभल्यांना पाणी पाजणारा असल्याचा आजवरचा इतिहास आहे. सध्या या मतदारसंघातील विद्यमान आ. संतोष सांबरे हे उच्चशिक्षित असून, त्यांनी आतापर्यंत या मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली आहेत.
विशेष म्हणजे या मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत महायुतीला मताधिक्य देण्याची परंपरा कायम राखत ४६ हजारांची लीड मिळवून दिली. मात्र लोकसभेत मोदी लाट होती. ही लाट विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील का? हा एक प्रश्नच आहे. तालुक्यात शिवसेनेतही सुंदोपसुंदी आहे, काही शिवसैनिक खा. चंद्रकांत खैरे यांना भेटल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादीत भाऊगर्दी
हा मतदारसंघ आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी आहे. प्रत्येकाला तिकिटासाठी कसरत करावी लागणार, हे निश्चित. यामध्ये बबलू चौधरी, जि.प. सदस्य बाबासाहेब सोनवणे, सुभाष मगरे, माजी सनदी अधिकारी मोहन तायडे, डॉ भालशंकर आदी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र सत्ताधारी असणाऱ्या आघाडीच्या नेत्यांनी शहराच्या विकासाचे स्वप्नच आतापर्यंत जनतेला दाखविले आहे.
आगामी निवडणूक विविध विकास कामांंवरच लढविली गेली तर, निवडणुकीच्या प्रचारात प्रत्येक राजकीय पक्ष या कामांची बेरीज वजाबाकी करेल, हे निश्चित.
मनसेचे इंजिनही धावणार
मनसेनेही सक्षम उमेदवार देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या या मतदारसंघातील जनतेने जि.प. व पं.स. च्या माध्यमातून मनेसेच्या इंजिनला बळ देणे सुरू केले आहे.
मनसेच्या पुढारीही विविध माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या या मतदारसंघातून मनसेचे माथाडीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली गायकवाड, माजी सभापती सुदामराव सदाशिवे हे इच्छुक आहेत.
महायुती, काँग्रेस आघाडीसह मनसेचे इच्छुक आपापल्या परीने मतदारांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन ध्यानाकर्षण करीत आहेत. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत मोर्चेबांधणी करीत आहेत. सर्वसामान्यांचे प्रश्न आपापल्या परीने सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत.
विकासाची भूक कायम
या मतदारसंघात विकास कामे फारशी झालेली नाहीत. विशेषत: ज्या गावाच्या नावाने हा मतदारसंघ ओळखला जातो, अशा बदनापूर शहरातील बसस्थानक, पिण्याचे पाणी, भूमिगत गटार, वळण रस्ता, औद्योगिक विकास आदी अनेक कामे त्वरित होणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त संपूर्ण मतदारसंघात रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आदी विकास कामांची प्रतीक्षा आजही कायम आहे.
२००९ : प्रमुख ३ उमेदवारांची मते
शिवसेनासंतोष सांबरे ५६२४२
राष्ट्रवादीसुदामराव सदाशिवे ३७३३४
मनसे बबलू चौधरी ३५९०८
इच्छुकांचे नाव पक्ष
संतोष सांबरे शिवसेना
बबलू चौधरीराष्ट्रवादी काँग्रेस
मोहन तायडेराष्ट्रवादी काँग्रेस
सुदाम सदाशिवेमनसे