नोटा बदली प्रकरणावर अखेर पडदा
By Admin | Updated: July 13, 2017 01:04 IST2017-07-13T00:52:36+5:302017-07-13T01:04:27+5:30
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर अधिकाऱ्यांनीच पडदा टाकला आहे.

नोटा बदली प्रकरणावर अखेर पडदा
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदली प्रकारावर अधिकाऱ्यांनीच पडदा टाकला आहे. चौकशीमध्ये त्रुटी आढळून कोणावरही कारवाई झालेली नाही. कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचा दावा केला जात आहे.
जुन्या पाचशे आणि एक हजारांच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयानंतर एसटी महामंडळातील काहींनी प्रवाशांकडून आलेल्या नोटांची रक्कम काढून घेऊन पाचशे, एक हजारांच्या नोटांचा भरणा केला. हा प्रकार ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर याप्रकरणी चौकशी करण्यात आली. यात लेखा अधिकारी आणि विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे सिडको बसस्थानकातील रोकड शाखेची तपासणी केली होती. यामध्ये ८ ते ११ नोव्हेंबर या कालावधीत रोखपालांकडे वाहकांनी दिलेल्या नोटा तसेच आरक्षण, पासेस आदींच्या माध्यमातून आलेल्या नोटा व बँकेत भरणा झालेल्या नोटांची पडताळणी केली. त्यांचा तुलनात्मक विचार करता त्यामुळे त्रुटी आढळल्याचे विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांनी नमूद केले. परंतु याबाबतीत जबाब घेतल्यावर रोखपालांना मात्र क्लीन चिट देण्यात आली.
रोखपालांनी जबाबात म्हटले की, नोटाबंदीच्या निर्णयानंतर प्रवासी वाहकांकडे एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटाच देत होते. त्यामुळे वाहकांना पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. सिडको बसस्थानकात इतर विभागांच्या अनेक बसेस येतात. या बसेसचे वाहक कमी मूल्याच्या नोटा घेण्यासाठी रोकड शाखेत येत होते. एसटी महामंडळाचेच कर्मचारी असल्यामुळे आम्ही त्यांना नोटा बदलून दिल्याचे रोखपालांनी जबाबात सांगितले. कोणताही गैरप्रकार झाला नसल्याने कोणावरही कारवाई झाली नसल्याचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले.