भंगार,निरुपयोगी साहित्याचा नगर पालिकेत खच !

By Admin | Updated: June 25, 2014 01:05 IST2014-06-25T00:19:04+5:302014-06-25T01:05:09+5:30

उस्मानाबाद : शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर पालिकेला गत काही दिवसांपासून कचराकुंडीसारखे स्वरूप आले आहे़

Scrap, wasteful waste of municipality in city! | भंगार,निरुपयोगी साहित्याचा नगर पालिकेत खच !

भंगार,निरुपयोगी साहित्याचा नगर पालिकेत खच !

उस्मानाबाद : शहराचा कारभार हाकणाऱ्या नगर पालिकेला गत काही दिवसांपासून कचराकुंडीसारखे स्वरूप आले आहे़ कर आकारणी, बांधकाम परवाना विभागासह सुवर्ण जयंती विभागातील कर्मचाऱ्यांना कचऱ्यात बसूनच कारभार हाकावा लागत आहे़ तर छतावर लाखो रूपयांचे पथदिव्याचे साहित्य उघड्यावरच ठेवण्यात आले आहे़ शिवाय स्वच्छ शहराचे स्वप्न रंगविणाऱ्या पालिकेच्या भिंतींनाच आता पिचकाऱ्यांचे रंग चढू लागले आहेत़
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद नगर पालिकेने कॅरीबॅगमुक्त शहर, स्वच्छ शहर आदी कौतुकास्पद उपक्रम हाती घेतले आहेत़ पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी हे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले असले तरी याला मूर्त रूप देण्याकडे पदाधिकाऱ्यांनी साफ दुर्लक्ष केले असून, अधिकाऱ्यांचाही कानडोळा आहे़ त्यामुळे कर्मचारी ‘हम करे सो कायदा’ असे म्हणत काम करताना दिसतात़ व्यापारी महासंघाला सोबत घेऊन पालिकेने कॅरीबॅग मुक्त शहर बनविण्याचा निर्णय घेतला़ प्रारंभीच्या काळातील कारवाई वगळता नंतर कोणतीच कारवाई झाल्याचे दिसून येत नाही़ स्वच्छ शहराचे तीन-तेरा वाजले आहेत़ त्यामुळे हे उपक्रम आणि त्यांची घोषणाबाजी केवळ नावालाच का ? असा प्रश्न शहरवासियांना पडला आहे़
सद्यस्थितीत पालिका इमारतीची प्रवेशद्वारापासून छतापर्यंत कचराकुंडीगत अवस्था झाली आहे़ ठिकठिकाणच्या भिंतींना पिचकाऱ्यांचे रंग चढले आहेत़ स्वच्छ शहराचे स्वप्न पाहणाऱ्या पालिकेच्या भिंतीच रंगलेल्या असतील तर स्वच्छ शहराचे स्वप्न प्रत्यक्षात कधी येणार हाच खरा प्रश्न आहे़ पहिल्या मजल्यावर कर आकारणी, बांधकाम परवाना विभागासह सुवर्ण जयंती विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत बसून काम करावे लागत आहे़ या विभागाला केलेले पार्टीशनही भंगारागत झाले असून, कपाटातील फायलींवर धूळ चढला आहे़ अनेक ठिकाणी जुन्या फाईली उघड्यावरच टाकण्यात आल्या आहेत़ पालिकेच्या छतावर प्रवेश केल्यानंतर विचित्र परिस्थितीच समोर येते़ छत म्हणजे पूर्णत: कचराकुंडीच ! या छतावर पथदिव्यांचे लाखो रूपयांचे साहित्य उघड्यावर ठेवण्यात आले आहे़
पाऊस आल्यानंतर या साहित्याला जंग चढतो़ त्यातील होल्डर, वायरिंग खराब होते़ जेव्हा गरज पडेल तेव्हा पालिकेच्या तिजोरीतील (पर्यायाने नागरिकांच्या) पैसा खर्च करून होल्डर, वायर बसविण्यात येत आहे़ गेलेल्या ट्यूब मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आल्या असून, फुटलेल्या ट्यूबांचे काच ठिकठिकाणी पडले आहेत़ एकूणच शहरवासियांना मोठ-मोठी स्वप्ने दाखवित अंगणातील घाणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण अशी चर्चा रंगू लागली आहे़ (प्रतिनिधी)
दुपारी कार्यालये ओस
कार्यालयीन वेळेत दुपारी ‘पोटपूजे’साठी सुटी झाली की, कर्मचारी नंतर कार्यालयात येतील की नाही याचा पत्ता पदाधिकाऱ्यांना सोडाच अधिकाऱ्यांनाही लागत नाही़ ते कोठे गेले होते याची विचारणा करण्यास कोणासही वेळ नाही़ त्यामुळे दुपारनंतर पालिकेतील बहुतांश कार्यालये ओस दिसून येतात़ त्यामुळे कामकाजासाठी दिवसातून दोन-तीन चकरा मारल्याशिवाय त्यांचे काम होत नसल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत़
लिलाव होणे गरजेचे
पालिका इमारतीच्या प्रवेश द्वारापासून ते छतापर्यंत ठिकठिकाणी लाखो रूपयांचे साहित्य भंगारागत पडले आहे़ यातील भंगार साहित्याचा लिलाव वेळेवर होण्याची गरज आहे़ पालिकेतील साहित्य सुरक्षित राहते, मात्र बाहेर पडलेल्या साहित्यावर चोरट्यांचा नेहमीच डोळा असतो़ त्यामुळे भंगाराचा लिलाव करून वेळेत केल्यानंतर पालिकेच्याच तिजोरीत त्यातून भर पडणार आहे़ त्यामुळे भंगाराची लिलावातून विक्री करावी, अशी मागणी होत आहे़
स्वच्छतागृहाचा अभाव
जिल्ह्याच्या मुख्यालयाची नगर पालिका असतानाही याठिकाणी स्वच्छता गृहाचा मोठा अभाव आहे़ त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पालिकेच्या आवारातच आडोसा शोधावा लागतो़ परिणामी विशेषत: महिला वर्गाची मोठी कुचंबणा होत आहे़ असे असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधितांनी हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी अधिकारी, कर्मचाऱ्यांसह येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांमधून होत आहे़

Web Title: Scrap, wasteful waste of municipality in city!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.