‘त्या’ तूर खरेदीची व्याप्ती जिल्हाभर!
By Admin | Updated: June 8, 2017 00:36 IST2017-06-08T00:35:26+5:302017-06-08T00:36:41+5:30
जालना : जिल्ह्यातील नाफेडच्या हमीभाव केंद्रावरील तूर खरेदीचा तपास अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे

‘त्या’ तूर खरेदीची व्याप्ती जिल्हाभर!
राजेश भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील नाफेडच्या हमीभाव केंद्रावरील तूर खरेदीचा तपास अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. ३० टक्के कागदपत्रांतून तब्बल ८० लाखांचा घोटाळा उघडकीस आला असून, अद्याप ७० टक्के कागदपत्रे हस्तगत करावयाची आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचे याचा अधिक तपास तालुका स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक निबंधक आणि तहसीलदार हे करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जिल्ह्यातील जालना, तीर्थपुरी, परतूर आणि अंबड येथे नाफेडचे हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. चार टप्प्यांत तूर करण्यात आली. पैकी दोन टप्पे हे नाफेड, तर उर्वरित दोन टप्पे हे राज्य शासनाने तूर खरेदी केलेली आहे. यात अनागोंदी झाल्याचा आरोप झाल्याने पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पोलिसांमार्फत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार १५ मे रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे याचा तपास सोपविण्यात आला. केचळ २० दिवसांत एलसीबीच्या पथकाने तपास पूर्ण केला. या काळात केवळ ३० टक्के कागदपत्रे उपलब्ध झाली. याचा तपास करुन संबंधित व्यापाऱ्यांची चौकशी करण्यात आली. यात जवळपास २५ व्यापारी दोषी आढळून आल्याचे समजते.
या प्रकरणात ३० टक्के प्राप्त झालेल्या कागदपत्रांतून प्राथमिक स्तरावर सुमारे ८५ लाखांचा घोटाळा उघडकीस येत असून, संपूर्ण तूर खरेदी प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा पुढे येण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. या प्रकरणाचा अंतरिम अहवाल नुकताच जिल्हाधिकाऱ्यांना सादर झाला आहे. त्यानुसार या प्रकरणाची व्याप्ती जिल्हाभरात असल्याने महसूल व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासात मदत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी दिले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहकार विभागाचे सहायक निबंधक आणि तहसीलदार यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमार्फत अंबड, तीर्थपुरी, परतूर आदी केंद्रांवरील नाफेडच्या तूर खरेदीचा तपास केला जाईल. या प्रकरणात मोठे व्यापारी गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.