शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शास्त्रज्ञ

By Admin | Updated: September 2, 2014 01:53 IST2014-09-02T01:11:23+5:302014-09-02T01:53:55+5:30

परभणी: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली आहे.

Scientists run to help farmers | शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शास्त्रज्ञ

शेतकऱ्यांच्या मदतीला धावले शास्त्रज्ञ


परभणी: मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी ही मोहीम पुन्हा एकदा सुरु केली आहे. २ सप्टेंबरपासून या मोहिमेला प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेती समस्यांचे निवारण शास्त्रज्ञ करणार आहेत.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ३ वर्षांपूर्वी विद्यापीठ आपल्या दारी ही मोहीम सुरु केली. विद्यापीेठाच्या चार भिंतीत झालेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण शेतातच व्हावे, या उद्देशाने तत्कालीन कुलगुरु डॉ. के. पी. गोरे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि राज्यात मोहिमेचा नावलौकिक झाला होता. सलग तीन वर्षे ही मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेचे यश लक्षात घेऊन कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेस्वरलू आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आठही जिल्ह्यात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यात विशेष पीक संरक्षण हा विषय समोर ठेवण्यात आला आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्यात जाऊन शेतांना भेटी देतील. सद्य परिस्थितीत पीकसंरक्षण आणि आपत्कालीन पीक व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करतील. परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात २ ते १२ सप्टेंबर या काळात ही मोहीम राबविली जाणार असून मोहिमेचे उद्घाटन २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेस्वरलू यांच्या हस्ते होईल. संपूर्ण मराठवाड्याचे नियोजन करण्यात आले असून पथकांचीही बांधणीही करण्यात आली आहे. प्रत्येक पथकामध्ये शास्त्रज्ञ, संशोधक यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राज्य शासनाच्या कृषी विभागाचेही सहकार्य घेतले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Scientists run to help farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.