लोकवर्गणीतून बदलले शाळांचे रूपडे

By Admin | Updated: February 5, 2017 23:32 IST2017-02-05T23:27:27+5:302017-02-05T23:32:03+5:30

तुळजापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम त्या-त्या गावातील नागरिक व त्या शिक्षकांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केल्याचे दिसू लागले आहे.

Schools of changed schools | लोकवर्गणीतून बदलले शाळांचे रूपडे

लोकवर्गणीतून बदलले शाळांचे रूपडे

तुळजापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांची खालावलेली प्रतिमा सुधारण्याचे काम त्या-त्या गावातील नागरिक व त्या शिक्षकांनीच लोकवर्गणीच्या माध्यमातून सुरू केल्याचे चित्र तालुक्यात दिसू लागले आहे.
तालुक्यातील जि.प.च्या २०० शाळांपैकी १७१ शाळा ई-लर्निंग झाल्या असून, शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय लोकवर्गणीतून शाळा डिजिटल अथवा आयएसओ मानांकन मिळविण्याचे काम शिक्षण विभाग आणि शिक्षकांनी हाती घेतले आहे. सद्यस्थितीत कदमवाडी, आरळी (बु), कुंभारी, बसवंतवाडी या चार शाळांना आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, धोत्री, चव्हाणवाडी, हिप्परगा ताड, नांदुरी, काळेगाव, दिंडेगाव, कन्या प्र. मंगरुळ, येवती या शाळा आयएसओ नोंदणीसाठी प्रस्तावित आहे.
या माध्यमातून शाळा डिजिटल करण्यासोबतच शाळेच्या सजावटीवरही भर देण्यात आला आहे. काही शाळेच्या प्रांगणात बोअरवेल्स, स्वतंत्र नळांची सोय, शाळेतील प्रांगणात व खोल्यांच्या भिंतीवर अनेक महापुरुषांचे फोटो आणि सामान्यज्ञानाची माहितीही देवून शाळा बोलकी करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी प्रांगणात खेळत असतानाही ही चित्रे आकर्षित करून अभ्यासाची गोडी निर्माण करणारी ठरत आहेत.
डिजिटल प्रकारच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांची कौशल्ये वाढण्यास मदत होत आहे. पुस्तकातील धडे थेट पडद्यावर चित्रे, चित्रफितींच्या माध्यमातून दिसत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शाळेत येण्याचे प्रमाणही वाढल आहे. सोबतच शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही वाढायला मदत होत आहे. लोकसहभाग व शिक्षकांच्या सहकार्याने शाळेत समृद्ध शिक्षणाचा पाया रचला आहे. शाळेत ई-लर्निंग, वॉटर फिल्टरद्वारे विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, वापरातून वाया जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करीत फुलझाडी, प्रत्येक भिंतीवर बोधचित्र व संदेश, सुंदर रेखाटन यासारख्या आवश्यक त्या सुविधांची उपलब्धी करून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)

Web Title: Schools of changed schools