शाळकरी मुलीस पळवणाऱ्या सातही आरोपींना पकडले
By Admin | Updated: September 13, 2014 00:09 IST2014-09-13T00:01:01+5:302014-09-13T00:09:36+5:30
वसमत : तालुक्यातील गिरगाव येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणाऱ्या तरुणासह सातही आरोपींना कुरूंदा पोलिसांनी अटक केली आहे.

शाळकरी मुलीस पळवणाऱ्या सातही आरोपींना पकडले
वसमत : तालुक्यातील गिरगाव येथील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवणाऱ्या तरुणासह सातही आरोपींना कुरूंदा पोलिसांनी अटक केली आहे. पळवून नेलेल्या मुलीचा शोध घेऊन २४ तासाच्या आत आरोपी गजाआड करण्याची कामगिरी पोलिसांनी केली. तपासात ‘व्हॉटस्अप’चा आधार घेवून मुलीसह तरुणास मनमाड येथे ताब्यात घेण्यात आले.
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे इयत्ता आठवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीस गावातीलच २५ वर्षीय तरुणाने १० सप्टेंबरच्या रात्री फुस लावून पळवून नेले होते. सदर प्रकरणी मुलीच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरून सात जणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांत संतापाचे वातावरण होते. कुरूंदा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. निळा (जि.नांदेड) येथील आरोपीचे मित्र व गुन्ह्यातील आरोपी असलेल्या गणपत जोगदंड, माधव जोगदंड व विजय जोगदंड यांना अटक करून माहिती काढण्यास सुरूवात केली असता आरोपी ज्ञानेश्वर कऱ्हाळे यास सदरील मित्रांनी पूर्णा रेल्वेस्थानकावरून दीक्षाभूमी एक्सप्रेसमध्ये बसवून दिल्याचे समोर आले.
पोलिसांनी मोबाईल लोकेशन घेतले असता मनमाड येथे हे दोघे असल्याचे समोर आले. कुरूंदा पोलिसांनी व्हॉटस्अपवर मुलगा व मुलीचा फोटो मनमाड पोलिसांना पाठविला व त्या आधारे मनमाड पोलिसांनी मुलाला सदर मुलीसह ताब्यात घेतले आणि त्यांनी कुरूंदा पोलिसांना कळवले. २४ तासाच्या आत मुलगी पोलिसांच्या ताब्यात आल्याने तणाव निवळण्यास मदत झाली. गुरूवारी सायंकाळपर्यंत पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली होती.
सहावा आरोपी चिमनाजी कऱ्हाळे हा गिरगाव येथील मळ्यात असल्याची खबर ग्रामस्थांना लागल्याने त्यांनी त्यास पकडले व पोलिसांना खबर दिली. गिरगाव येथे डीवायएसपी पियूष जगताप, पोनि नानासाहेब नागदरे दाखल झाले ग्रामस्थांनी आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिला. ग्रामस्थांनी मुलीला पळवून नेण्याच्या घटनेत पोलिसांनी कडक भूमिका घेवून आरोपीवर जरब बसेल अशी कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. पोनि नागदरे यांनी, अशा घटना घडल्या तर पोलिसांना विश्वासाने सांगण्यात मुलीचे नाव उघड होवू न देता कारवाई होईल, असे आश्वासन दिले. २४ तासाच्या आत या प्रकरणाचा तपास कुरूंदा पोलिसांनी केल्याने पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
या प्रकरणात पोनि नानासाहेब नागदरे, सपोनि यशवंत कदम, जमादार बी.टी. केंद्रे, राठोड, चव्हाण आदी कर्मचाऱ्यांसह मनमाड पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली. (वार्ताहर)