औरंगाबाद : शहरातील इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या शाळा येत्या २० डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी घेतला आहे. जवळपास पावणे दोन वर्षांनंतर शहरातील प्राथमिक विभागाच्या शाळा गजबजणार आहेत.
कोरोनामुळे राज्यातील प्राथमिक शाळा १६ मार्च २०२० पासून बंद आहेत. राज्यशासनाने १ डिसेंबरपासून प्राथमिक शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. मात्र, ओमायक्रॉन विषाणूचा धोका लक्षात घेता, शहरातील सर्व शाळांमधील पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबतचा निर्णय १० डिसेंबरनंतर घेण्यात येणार असल्याचे प्रशासक पाण्डेय यांनी जाहीर केले होते. प्रशासकांनी ओमायक्रॉन विषाणूच्या प्रादुर्भावावर आणखी पाच दिवस लक्ष ठेवून निरीक्षण केले जाईल. त्यानंतर पहिली ते सातवीपर्यंतची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.
सोमवारी त्यांनी २० डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिका आणि खासगी शाळांना सूचना देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी रामनाथ चौरे यांनी सांगितले. शहरात महापालिकेच्या ७१, तर ८७५ खासगी शाळा आहेत. शाळा कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थी मागील वर्षीपासून ऑनलाईन शिक्षण घेत होते. आता त्यांची यातून मुक्तता होणार आहे. पुढील आठवड्यापासून विद्यार्थ्यांना शाळेत नेहमीप्रमाणे ऑफलाईन शिक्षण मिळेल.