बीईओ कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा..!
By Admin | Updated: July 8, 2017 00:31 IST2017-07-08T00:29:46+5:302017-07-08T00:31:10+5:30
भोकरदन : प्रल्हादपूर येथील ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून गटशिक्षाधिकारी कार्यालयात शाळा भरवली.

बीईओ कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा..!
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : शाळेची गुणवत्ता घसरण्यास येथील शाळेची शिक्षिका जबाबदार आहे. यामुळे शिक्षिका वंदना वरपे यांची बदली करण्याची मागणी तालुक्यातील प्रल्हादपूर येथील ग्रामस्थांनी आठवड्यापूर्वी गटशिक्षणाधिकारी देवराव पांडव यांच्याकडे निवेदनाव्दारे केली होती. मात्र, यावर कुठलाच निर्णय न झाल्याने शुक्रवारी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावून गटशिक्षाधिकारी कार्यालयात शाळा भरवली.
येथील शिक्षिका शाळेत वेळेत तर येतच नाही. आल्या तर विद्यार्थ्यांना शिकवित नसल्याच्या अनेक तक्रारी पालकांच्या होत्या. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी देवराव पांडव यांना निवेदन देऊन संबंधित
शिक्षिकेची इतरत्र बदली करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली होती.या निवेदनावर शालेय समिती अध्यक्ष विष्णू पाटील गाढे, राजेंद्र नामदे, शंकर नामदे, आपासाहेब जाधव ,जगन नामदे, सुरेश गायकवाड, लकेश नामदे, भाऊसाहेब शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.
अखेर शुक्रवारी संतप्त ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना घेऊन गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शाळा भरवली.