विष्णूपुरीत शालेय विद्यार्थ्याचे अपहरणनाट्य
By Admin | Updated: July 3, 2014 00:22 IST2014-07-03T00:02:53+5:302014-07-03T00:22:44+5:30
नांदेड : विष्णूपुरी भागात बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचे एका सहा वर्षीय विद्यार्र्थिनीने सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली़

विष्णूपुरीत शालेय विद्यार्थ्याचे अपहरणनाट्य
नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विष्णूपुरी भागात बुधवारी सकाळी एका शाळकरी मुलाचे कारमधून आलेल्या तिघांनी अपहरण केल्याचे एका सहा वर्षीय विद्यार्र्थिनीने सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली़ या परिसरात पोलिसांनी बराच काळ नाकाबंदी करुन तपासणीही केली़ परंतु अद्याप हरविल्याची किंवा अपहरणाची कोणतीही तक्रार मात्र पोलिसांकडे आली नाही़
विष्णूपुरी भागातील मंजूषा मावंदे व श्रृती शिंदे या दोघी जणी बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास शंकरराव चव्हाण विद्यालय अर्सजन येथे जात होत्या़ यावेळी त्यांच्यासमोर पिवळा शर्ट व पाठीवर दप्तर असलेला मुलगा होता़ तोच अचानक मुलाच्या जवळ येवून एक कार थांबली़ कारमधील दोघांनी मुलाला जबरदस्ती आत ओढले़ यावेळी मंजूषा हिचाही त्यातील एकाने हात पकडून खेचण्याचा प्रयत्न केला़ परंतु मंजूषाने समोरील व्यक्तीच्या हाताचा चावा घेतला तर श्रृती शिंदे हिने त्याच्या हातावर दप्तर मारले़ त्यानंतर मंजूषा आणि श्रृती यांनी आरडा-ओरड करीत घर गाठून कुटुंबियांना हकीकत सांगितली असल्याचे मंजूषा या चिमुकलीने रडत-रडतच सदर प्रतिनिधीला सांगितले़ त्यानंतर ग्रामस्थांनी ही बाब नांदेड ग्रामीण पोलिसांना कळविली़ पोलिसांनी वाहनांद्वारे सर्व भागात शोधमोहिम राबविली़ नाकाबंदीही करण्यात आली होती़ परंतु अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत़ दरम्यान, ग्रामस्थांनी मुलाचा शोध घेण्यासाठी परिसरातील शाळा त्यांनी धुंडाळून काढल्या़
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे म्हणाले, आम्हाला ग्रामस्थांकडून तशी माहिती मिळाली होती़ त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहिमही राबविली़ परंतु मुलगा हरविल्याची अद्यापही आमच्याकडे तक्रार नाही़ (प्रतिनिधी)