नियमबाह्य डोनेशन मागणाऱ्या शाळा जि.प.च्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:26 IST2017-05-26T00:23:52+5:302017-05-26T00:26:52+5:30
बीड : यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जूननंतर सुरू होत आहे. त्यापूर्वी काही खाजगी शाळा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या तयारीत आहेत.

नियमबाह्य डोनेशन मागणाऱ्या शाळा जि.प.च्या रडारवर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : यंदाचे शैक्षणिक सत्र १५ जूननंतर सुरू होत आहे. त्यापूर्वी काही खाजगी शाळा विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या तयारीत आहेत. १५ जून पूर्वी प्रवेश देऊ नयेत व नियमबाह्य डोनेशन घेऊ नयेत, असे आदेश शिक्षणाधिकारी (मा.) विक्रम सारुक यांनी गुरुवारी दिले आहेत.
विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांना पालकांकडून डोनेशन घेता येते, मात्र काही शाळा डोनेशनचे शुल्क पालक समितीला विचारत न घेता परस्पर ठरवितात. यातून पालकांची लूट होते. त्यामुळे बेकायदेशीर डोनेशन मागणाऱ्या संस्थांवर आरटीई कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी औरंगाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल पाटील यांनी केली होती. या संदर्भातील त्यांनी बीड जि.प.ला एक निवेदन दिले होते. त्याचा संदर्भ देत शिक्षणाधिकारी (मा.) सारुक यांनी हे आदेश काढले आहेत. विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वंयअर्थसहायित व्यवस्थापनाच्या मान्यताप्राप्त शाळांनी शुल्काची निश्चिती करुन त्यास पालक-शिक्षक समितीची मान्यता घ्यावी, निश्चित केलेले शुल्क शाळेच्या दर्शनी भागावर लावावे, प्रवेशासाठी डोनेशन अथवा पालकांच्या मुलाखती घेणे नियमबाह्य आहे. शैक्षणिक साहित्य शाळांनी निश्चित केलेल्या दुकानदारांकडून आग्रह करणेही बेकायदेशीर आहे. त्यामुळे शाळांनी या सर्व बाबींचे काटेकोर पालन करावे, असे आदेश सारुक यांनी मुख्याध्यापकांना दिले आहेत.