शाळा ६ दिवसांपासून कुलूपबंद
By Admin | Updated: July 17, 2014 00:22 IST2014-07-17T00:15:04+5:302014-07-17T00:22:29+5:30
निवघाबाजार: येथून जवळच असलेल्या जि़ प़ शाळा बोरगावच्या शाळेला मागील सहा दिवसांपासून कुलूप बंद आहे़ यावर अद्याप तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़
शाळा ६ दिवसांपासून कुलूपबंद
निवघाबाजार: येथून जवळच असलेल्या जि़ प़ शाळा बोरगावच्या शाळेला मागील सहा दिवसांपासून कुलूप बंद आहे़ यावर अद्याप तोडगा न निघाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़
बोरगावच्या शाळेत शिक्षकांची चार पदे रिक्त आहेत़ वारंवार मागणी करुनही दूर्लक्ष करण्यात येत असल्याने ग्रामस्थांनी संतप्त पवित्रा घेत ११ जुलै रोजी शाळेला कुलूप लावले़ सहा दिवस लोटले तरी ही स्थिती अद्याप कायम आहे़ याबाबत केंद्रप्रमुख एस़ डी़ शिंदे यांना विचारणा केली असता पंचायत समितीला ६० शिक्षक आलेत, त्यापैकी ४० शिक्षक त्या-त्या शाळेत नियुक्त झाले आहेत़ आणखी २० शिक्षक शिल्लक आहेत़ पैकी काही शिक्षक निवघा केंद्रात पाठविले तर शाळेचे कुलूप लागण्याचे प्रकार थांबतील़ गटशिक्षणाधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल स्वीच आॅफ होता़
बोरगाव (ह) येथील जि़प़ शाळेच्या रिक्त शिक्षकांच्या भरतीसंदर्भात वेळोवेळी शिक्षण विभागाला कळविले़ परंतु आमच्या मागणीकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले़ किमान दोन शिक्षक नियुक्त होईपर्यंत शाळेचे कुलूप काढणार नसल्याचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव देशमुख यांनी सांगितले़
शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ रिक्त शिक्षकांची पदे भरल्याशिवाय शाळेचे कुलूप न काढण्याचा पवित्रा सरपंच लक्ष्मीबाई वामनराव कदम यांनी घेतला आहे़ शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून उपलब्ध शिक्षक शाळेबाहेर विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत आहेत़ (वार्ताहर)
नुकतेच पंचायत समितीला ६२ शिक्षक मिळाले, त्यापैकी एक शिक्षक बोरगावच्या जि़प़ शाळेला दिला़ परंतु ग्रामस्थ आणि शालेय व्यवस्थापन समिती किमान दोन शिक्षक दिल्याशिवाय शाळेचे कुलूप काढणार नसल्यावर अडून बसले आहेत़ एक-दोन दिवसात यावर तोडगा निघेल - अशोक जीवने, शिक्षण विस्तार अधिकारी
शाळेला कुलूप असल्याने सहा दिवसांपासून शालेय पोषण आहार बंद आहे़ यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला़ तर शाळा व्हरांड्यात बसत असल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष बाहेर राहत आहे़ यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे सांगितले़ सध्या पावसाळा असल्याने पाऊस आला की विद्यार्थी भिजत आहेत - एस़बी़ पाटील, मुख्याध्यापक