शाळा तपासणी अधिकाऱ्यांना दमदाटी
By Admin | Updated: July 20, 2014 00:34 IST2014-07-19T23:58:44+5:302014-07-20T00:34:56+5:30
पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली.

शाळा तपासणी अधिकाऱ्यांना दमदाटी
पाटोदा : तालुक्यातील तांबा राजुरी येथील मूकबधिर व मतीमंद विद्यालयाच्या तपासणीसाठी गेलेल्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या एका सदस्यासह इतर काही लोकांनी दमदाटी केली. प्रकरण वाढण्याची लक्षणे दिसताच अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतल्याने पुढील प्रकार टळला.
शिरूर येथील विद्याविकास संस्थेचे तांबा राजुरी येथे मूकबधिर व मतीमंद विद्यालय आहे. या संस्थेचे अध्यक्ष गंगाधर सुपेकर यांनी राजीनामा दिलेला आहे. हे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे असल्याने अद्याप कागदोपत्री तेच अध्यक्ष आहेत. त्यामुळे अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुंदोपसंदी आहे.
या वादातूनच सुपेकर यांनी संस्थेतीलच काही कर्मचाऱ्यांना हाताशी धरून गावातीलच एका इमारतीमध्ये काही विद्यार्थ्यांना आणून ठेवलेले आहे. यास शासनाची अद्याप कुठलीही परवानगी नसल्याचे संस्थासचिव विठ्ठल तांबे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या तांबा राजुरी येथे दोन ठिकाणी शाळा भरत असल्याने पालकांचीही द्विधा मन:स्थिती आहे.
दरम्यान, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर राजीनामा दिलेले अध्यक्ष व काही कर्मचाऱ्यांनी पालकांशी भेटून काही विद्यार्थ्यांना शाळेसाठी म्हणून घेऊन आले. यानंतर शाळा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना न बसविता दुसऱ्याच ठिकाणी बसविले. यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर पांडुरंग पोकळे व छायाबाई केकान यांनी त्यांचे पाल्य ताब्यात घेऊन मूळ शाळेत पाठविले.
या संस्थेत असे प्रकार घडत असतानाच सचिव विठ्ठल तांबे यांनी पोलिसांसह जि.प. च्या समाज कल्याण विभागाकडे महिनाभरापूर्वी तक्रार दिली होती. या तक्रारीवरून समाज कल्याण विभागातील अधिकारी मोराळे व लांडे यांनी शुक्रवारी रात्री ८ च्या दरम्यान शाळा तपासणी करण्यासाठी तांबा राजुरी येथे गेले. तपासणी सुरू असताना संस्थेच्या संचालक मंडळातील नवनाथ तांबे, संभाजी तांबे, गणेश गायकवाड, धनंजय तांबे व इतरांनी शाळेत येऊन तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांशी तू-तू, मै-मै करीत प्रांगणात आरडा-ओरड केला. तसेच या अधिकाऱ्यांना दमदाटी केली.
अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने शाळा तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांचीही भंबेरी उडाली. पुढे काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी त्यांनी आपली तपासणी आटोपती घेत काढता पाय घेतला.
या प्रकरणी संस्थासचिव तांबे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रारही दिली. याप्रकरणातील संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे पोनि हुंबे यांनी सांगितले. तर, झाल्या प्रकरणी वरिष्ठांना अहवाल पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी एस. एस. शेळके यांनी सांगितले.
(वार्ताहर)
अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय
शिरूर येथील विद्याविकास या संस्थेचे तांबा राजुरी येथे आहे मूकबधीर व मतीमंद विद्यालय
या संस्थेचे अध्यक्ष व इतर सदस्यांमध्ये आहे वाद
या वादातूनच संस्थाध्यक्ष गंगाधर सुपेकर यांनी दिला आहे राजीनामा
अद्याप हे प्रकरण आहे धर्मादाय आयुक्तांकडे
संस्थाचालकांमधील वादातून सुपेकर यांनी दुसऱ्याच ठिकाणी शाळा भरविल्यामुळे पालकांमध्येही अधिकृत शाळेसंबंधी आहे संभ्रम
शाळा तपासणीकरिता आलेल्या जि.प.समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी काहींनी घातली हुज्जत