शाळांनी शुल्क नियमाप्रमाणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:10+5:302021-02-06T04:07:10+5:30
शिक्षण विभागाला सूचना ः राज्यमंत्री बच्चु कडू यांनी घेतला पाच जिल्ह्यांतील शिक्षणाचा आढावा औरंगाबाद ः जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची ...

शाळांनी शुल्क नियमाप्रमाणे
शिक्षण विभागाला सूचना ः राज्यमंत्री बच्चु कडू यांनी घेतला पाच जिल्ह्यांतील शिक्षणाचा आढावा
औरंगाबाद ः जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी, विद्यार्थी उपस्थिती वाढविण्याकडे लक्ष देताना शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणाधिकार्यांनी आठवड्यातून एक दिवसतरी शाळांना भेटी द्याव्यात. तसेच शाळा घेतलेले शुल्क नियमाप्रमाणे घेतले का, याची पडताळणी करा. दोषी आढळलेल्या शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात औरंगाबाद, जालना, बीड, हिंगोली, परभणी येथील शिक्षणाधिकार्यांची राज्यमंत्री कडू यांनी शुक्रवारी बैठक घेतली. जिल्हा परिषद शाळेची स्थिती सुधारण्यासाठी विषेश परिश्रम घेण्यासाठी त्यांनी अधिकार्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळांतील घटत चाललेली विद्यार्थी संख्या, खाजगी शाळांच्या वाढत्या तक्रारी चिंताजनक असुन याकडे प्रामुख्याने लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी शिक्षणाधिकार्यांना केल्या. अशी माहिती शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली. बैठकीला शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण, सुरजप्रसाद जयस्वाल, आशा गरुड, सुचिता पाटेकर, विठ्ठल भुसारे, श्रीकांत कुलकर्णी, संदिपकुमार सोनटक्के, पि. बी पावशे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शिक्षक व पालक संघटनांची स्वीकारली निवेदने
एसबीओए, पोद्दार, युनिव्हर्सल शाळेंसह खाजगी शाळेसंदर्भात पालकांच्या व शिक्षकांच्या तक्रारी राज्यमंत्री कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे शिक्षक, पालक संघटनांनी केल्या. त्यावर काय कारवाई केल्याचे विचारणा त्यांनी अधिकार्यांना केली. शाळांनी घेतलेली फि कायद्याप्रमाण घेतली का त्याची पडताळणी करा अशा सुचना राज्यमंत्री कडू यांनी शिक्षण विभागाला दिल्या.
---
उपसंचालकांनी घेतली बैठक
राज्यमंत्री कडू यांच्या बैठकीनंतर विभागीय शिक्षण उपसंचालक साबळे यांनीही शिक्षणाधिकार्यांची बैठक घेवून शाळेंकडून वाढत्या शुल्क वसुलीच्या तक्रारींवर कारवाई करण्याची गरज असल्याचे सांगत शाळांची पडताळणी करुन कारवाई करावी. तसेच शिक्षण विभागाचे नाहरकत शिवाय संबंधीत बोर्डांनाही त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल पत्राद्वारे कळवण्याच्या सुचना केल्या.
---
विद्यार्थी उपस्थिती ४२ टक्क्यांवर
विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण शाळा सुरु होताना सुरुवातीला २० ते २२ टक्के होते ते वाढून ४२ टक्क्यांपर्यंत पोहचल्याचे माहिती कडू यांना देण्यात आली. त्यावेळी आकडेवारी आणि प्रत्यक्ष स्थिती ही अधिकारी सांगतात त्यापेक्षा वेगळी दिसून येत असल्याचे कडू म्हणाले. त्यावेळी जिल्ह्यातील कोणतीही शाळा तपासण्याची विनंती शिक्षणाधिकारी जयस्वाल व चव्हाण यांनी केली. त्यानुसार तपासणी केलेल्या शाळांची यादी त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. आठवड्यातून एक दिवस जिल्हा परिषद शाळांत विद्यार्थी वाढतील यासाठी काम करण्याकरीता द्या, अशा सुचना त्यांनी केल्याचे साबळे यांनी सांगितले.