शिक्षण विभागातील खांदेपालटात ‘शाळा’!
By Admin | Updated: February 1, 2015 00:38 IST2015-02-01T00:38:08+5:302015-02-01T00:38:08+5:30
बीड :घोटाळ्याच्या गंभीर प्रकरणांचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नसताना शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी ‘चार्ज’ घेतलेल्या सुखदेव सानप यांनी खुर्चीत टेकल्यावर पहिला

शिक्षण विभागातील खांदेपालटात ‘शाळा’!
बीड :घोटाळ्याच्या गंभीर प्रकरणांचा ससेमिरा पाठ सोडायला तयार नसताना शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी ‘चार्ज’ घेतलेल्या सुखदेव सानप यांनी खुर्चीत टेकल्यावर पहिला निर्णय घेतला तो कामकाजातील फेरबदलाचा! मात्र, वरिष्ठांकडील कामे कनिष्ठांना दिल्याने हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
शिक्षण विभागात ५३ कर्मचारी कार्यरत आहेत. कामकाज सुरळीत होण्यासाठी अनुभव, कामाचे स्वरुप, पात्रता या बाबी पाहिल्या जातात. मात्र, सानप यांनी वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडे कनिष्ठ कर्मचाऱ्यांची कामे सोपवून भलताच पायंडा पाडला आहे. शिवाय काहींकडे फक्त एकच विभाग तर काहींना मात्र चार विभागाची जबाबदारी दिली आहे. कनिष्ठ सहायक बी. व्ही. केकाण यांना मावि-२ चे मूळ काम पाहून प्रावि १, मावि ३ ची जबाबदारी दिली आहे. बी. बी. भड यांना भांडार व बैठक ही मूळ कामे करून जावक विभाग पाहण्यास सांगितले आहे. वरिष्ठ सहायक बी. बी. डोळस यांच्याकडे भविष्य निर्वाह निधी, न्यायालयीन प्रकरणे ही मूळ जबाबदारी तर आहेत. शिवाय शालेय पोषण आहार विभागही दिला आहे.
शिक्षणाधिकारी सुखदेव सानप म्हणाले, शिक्षण विभागाचा कार्यभार सुरळीत करण्यासाठी सभापतींच्या आदेशानेच फेरबदल केले आहेत. कोणावर अन्याय करण्याचा हेतू नाही. कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतले आहे.
देव-घेव ‘पॅटर्न’
२१ जानेवारी रोजी निरंतरचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप यांच्याकडे शिक्षणाधिकारी (प्रा.) पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला. यापूर्वी ते पूर्णवेळ शिक्षणाधिकारी होते. खुद्द संचालकांनीही सानप अकार्यक्षम असल्याचा अहवाल दिला होता. आता सानप यांनी शिक्षण विभागात फेरबदल करुन ‘देव-घेव’ पॅटर्नची वाट मोकळी केल्याची चर्चा आहे.
कार्यालयीन कामासाठी
गेलेल्यांना नोटीस
सीईओ नामदेव ननावरे यांनी २३ ते २७ जानेवारी दरम्यान कनिष्ठ सहायक गणेश सारुक यांना कार्यालयीन कामासाठी पुणे येथे पाठवले होते. इकडे मात्र सानप यांनी सारुक यांना अनाधिकृत गैरहजर असल्याचा ठपका ठेवत वेतन कपातीची नोटीस पाठविली. कनिष्ठ सहायक एफ. ए. पठाण यांनाही साप्ताहिक गोषवाऱ्याच्या किरकोळ कारणावरुन नोटीस पाठविली. अनेक कर्मचारी दिवसभर खुर्चीत नसतात, कामांत कुचराई करतात असे असताना विशिष्ट कर्मचाऱ्यांना सानप यांनी लक्ष्य केल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)४
आंतरजिल्हा बदली, प्राथमिक विभाग १, २ ही पदे ‘क्रीमपोस्ट’ची समजली जातात. या पदांचा ‘चार्ज’ मिळविण्यासाठी कर्मचाऱ्यांत चढाओढ आहे. सानप यांनी शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारताच या पदांचा ‘भाव’ वाढला. त्यामुळे काहींनी ही पदे पदरात पाडून घेण्यासाठी ‘फिल्डींग’ लावली होती.