स्कूल बसचालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण विकतात भाजीपाला तर काही करतात मिळेल ते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:03 IST2021-05-19T04:03:56+5:302021-05-19T04:03:56+5:30

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे स्कूलबसचे स्टेअरिंग आणि चाके जाम असून, १४ महिन्यांपासून चालकांना काम नसल्याने कोणी भाजीपाला विकत आहे, ...

School bus drivers not working for 14 months; Some sell vegetables while others do the job | स्कूल बसचालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण विकतात भाजीपाला तर काही करतात मिळेल ते काम

स्कूल बसचालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण विकतात भाजीपाला तर काही करतात मिळेल ते काम

औरंगाबाद : कोरोना महामारीमुळे स्कूलबसचे स्टेअरिंग आणि चाके जाम असून, १४ महिन्यांपासून चालकांना काम नसल्याने कोणी भाजीपाला विकत आहे, तर कोणी मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शहरातील स्कूलबस असलेल्या जवळपास १००० पेक्षा अधिक शाळा असून, जवळपास १४ हजार मुलांची दररोज ने-आण केली जात होती. २००० स्कूलबसवर २००० चालकांच्या कुटुंबाचा भार होता. परंतु कोरोना महामारीने सर्वांच्या आशा-आकांक्षावर पाणी फिरले आहे. १४ महिन्यांचा वनवास शाळेत विद्यार्थी ने-आण करणाऱ्यांवर आला आहे. एकही गाडी रस्त्यावर फिरताना दिसली नाही. मध्यंतरी शाळा सुरू झाल्याची घोषणा झाली आणि पुन्हा लॉकडाऊन झाले, काही वाहनचालकांनी आपली वाहने बाहेरही काढली नाहीत. परंतु बँक व वित्त संस्थांचा कर्जवसुलीसाठी तगादा सुरू झाला. हीच मोठी डोकेदुखी नागरिकांना सहन करावी लागली. अजून अशी अवस्था किती दिवस राहणार, पोट भरण्यासाठी चालक आणि बस मालकांची तारेवरची कसरत सुरू झाली आहे.

- १३६९० मुले स्कूलबसने दररोज प्रवास करत होती.

- २००० स्कूल बस

- २००० चालक

मागण्या...

- लॉकडाऊन काळात वित्त संस्था, बँकांकडून कर्जाच्या हप्त्यांची वसुली थांबवावी.

- शाळा सुरू झाल्यावर नियमाप्रमाणे त्यांचे ऋण फेडण्यास तयार आहोत.

- शासनाने कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल अशा स्थितीत पॅकेज घोषित करावे.

- कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ द्यावी.

- पाल्यांच्या शाळेची फी माफ करावी.

चालकांच्या प्रतिक्रिया...

भाजीपाला विकावा लागतो...

स्कूलचा चालक आणि मालक असूनदेखील शाळाच बंद असल्याने बस उभ्याच आहेत. त्या चालविण्याची परवानगीच नाही. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी भाजीपाला विकण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनच्या काळात फक्त तोच व्यवसाय सुरू आहे.

- शेख नाजेर पटेल

मिळेल ते काम करतो...

बस बंद असल्याने खासगी कारखान्यात मिळेल ते रोजंदारीवर काम करण्यासाठी जात आहे. त्यातून कुटुंबाला सहारा मिळत आहे. आठवड्यातून नियमित हाताला कामदेखील मिळत नाही.

- शांताराम खरात

रिक्षा चालवीत आहे...

शाळा बंद असल्याने बस बंद असल्याने मुलांना सोडण्याचा प्रश्नच नाही. काम नसल्याने आता रिक्षा चालीवत आहे. शहरात रिक्षालादेखील दोन प्रवाशांची परवानगी आहे. कोरोनाचे नियम पाळूनच रस्त्यावर वाहन चालवावे लागत आहे.

- प्रकाश तरटे

मजुरीशिवाय पर्याय नाही..

मजुरी काम करताना एका ठेकेदाराकडे काम नियमित मिळेल हे सांगता येत नाही. परंतु जीवनाचा गाडा चालविण्यासाठी अंगमेहनतीचे काम करावे लागत आहे. कारखान्यातदेखील काम मिळत नाही, मग मोलमजुरीशिवाय पर्याय नाही.

- भगवान दांडगे

(स्टार ७२८ डमी)

Web Title: School bus drivers not working for 14 months; Some sell vegetables while others do the job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.