खेळाडूंची शिष्यवृत्ती बँक खात्यावर जमा
By Admin | Updated: May 19, 2015 00:49 IST2015-05-19T00:19:51+5:302015-05-19T00:49:13+5:30
महेश पाळणे ,लातूर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना राज्य शासनामार्फत प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते़

खेळाडूंची शिष्यवृत्ती बँक खात्यावर जमा
महेश पाळणे ,लातूर
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व प्राविण्यप्राप्त खेळाडूंना राज्य शासनामार्फत प्रतिवर्षी शिष्यवृत्ती मिळते़ मात्र मागील दोन वर्षातील लातूर जिल्ह्यातील खेळाडूंची शिष्यवृत्ती रखडली होती़ याबाबत ‘लोकमत’मध्ये शनिवारी वृत्त प्रकाशित होताच क्रीडा खात्याने सोमवारी दुपारी खेळाडूंच्या बँक खात्यात सदर शिष्यवृत्ती रक्कम जमा केल्याने खेळाडूत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले़
खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्य शासन प्रतिवर्षी शालेय स्पर्धेसह पायका (ग्रामीण) व महिला क्रीडा स्पर्धेतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व पदकविजेत्या खेळाडुंना शिष्यवृत्ती देते़ मात्र सन २०१२-१३ व २०१३-१४ या दोन वर्षाची शिष्यवृत्ती क्रीडा कार्यालयाने अनुदान असूनही रखडत ठेवली होती़ अनेक खेळाडूसह पालक व क्रीडा शिक्षकांनी गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी क्रीडा कार्यालयात खेटे मारले़ मात्र त्याची कोणीही दखल घेतली नाही़ दोन दिवसापूर्वी ‘लोकमत’ने ‘खेळाडुंची शिष्यवृत्ती लटकली’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करताच क्रीडा खाते जागी झाले़ सोमवारी दुपारी त्या-त्या खेळाडूच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली असल्याची क्रीडा कार्यालयामार्फत सांगण्यात आले़ मंगळवारी सदर रक्कम खेळाडूंच्या हाती पडेल़ यात जिल्ह्यातील १०३ खेळाडूंचा समावेश असून, विविध खेळातील खेळाडूंना एकूण २ लाख १३ हजार ५५० रुपयांचा लाभ मिळणार आहे़ यामुळे खेळाडू वर्गातून समाधान व्यक्त होत आहे़