शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची होतेय हेळसांड
By Admin | Updated: September 11, 2014 00:23 IST2014-09-11T00:22:29+5:302014-09-11T00:23:36+5:30
व्यंकटेश वैष्णव, बीड मासावर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन दाखल करतेवेळी विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची होतेय हेळसांड
व्यंकटेश वैष्णव, बीड
मासावर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अर्ज आॅनलाईन दाखल करतेवेळी विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया बंद असल्याने बारावी ते पदव्युत्तर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अर्ज स्वीकारताना महाविद्यालय व विशेष समाज कल्याण विभागाच्या कामात सुसूत्रता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाच्या वतीने एक संकेतस्थळ निर्माण करण्यात आले आहे़
मागील दोन वर्षांपासून सर्व प्रवर्गातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज भरावा लागत आहे. या आॅनलाईन प्रणालीचे कंत्राट 'मास्टेक' या कंपनीला दिलेले असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले़
जिल्ह्यात सर्व प्रवर्गातील एकूण ४८ हजार विद्यार्थी आहेत. आतापर्यंत २० ते २२ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरलेले असले तरी अद्याप अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थींनी आॅनलाईन अर्ज भरलेले नाहीत. विद्यार्थ्यांना शासनाच्या आॅनलाईन प्रणालीच्या तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत विशेष समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही संबंधित कंपनी व सामाजिक न्याय विभाग, पुणे यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. पुढील दोन दिवसात शिष्यवृत्ती आॅनलाईन प्रणाली सुरळीत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले़
अर्ज आॅनलाईन प्रक्रियेतील अडथळे
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी सर्व कागदपत्रे घेऊन इंटरनेट कॅफेवर जातात. काहीवेळा संकेतस्थळ उघडते़
पुढे महाविद्यालयाची यादी ‘स्क्रिनवर’ दिसत नाही. बँकेचे खाते सुरू होत नाही. तसेच संबंधित महाविद्यालयातील अभ्यासक्रम दिसत नाहीत.
अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी विद्यार्थ्यांना मागील पाच दिवसापासून सुरू आहेत़ याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल वाईकर यांनी केला आहे़
तात्काळ शिष्यवृत्ती प्रणाली सुरळीत करण्याची मागणी केली आहे.