जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात अडकले शिष्यवृत्तीचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:02 IST2021-06-29T04:02:06+5:302021-06-29T04:02:06+5:30

(स्टार : ८५८) - विजय सरवदे औरंगाबाद : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे. वर्ष लोटले, ...

Scholarship applications stuck in several colleges in the district | जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात अडकले शिष्यवृत्तीचे अर्ज

जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात अडकले शिष्यवृत्तीचे अर्ज

(स्टार : ८५८)

- विजय सरवदे

औरंगाबाद : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोरोना महामारीचा चांगलाच फटका बसला आहे. वर्ष लोटले, परंतु अजूनही जिल्ह्यातील सुमारे ५ हजार महाविद्यालयीन विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक विद्यार्थी गावी अडकून पडले असल्यामुळे शिष्यवृत्ती अर्ज मंजूर झाला की नाही, हेच त्यांना माहिती नाही. अर्जात त्रुटी निघाल्यामुळे तब्बल ४ हजार ७९१ विद्यार्थ्यांचे अर्ज अजूनही महाविद्यालयातच अडकून पडले आहेत.

दरम्यान, समाजकल्याण विभागाने आता शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दुरुस्त करून ‘हार्ड कॉपी’ सादर करण्यासाठी ३० जूनपर्यंतची महाविद्यालयांंना मुदत दिली आहे.

महाविद्यालयीन अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्ग प्रवर्गांचे विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिपचा लाभ दिला जातो. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिष्यवृत्ती अर्ज भरावे लागतात, मागील आर्थिक वर्षात विद्यार्थ्यांनी तसे अर्जही भरले; परंतु अर्जात राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करणे तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत व सोबत जोडलेली कागदपत्रे (हार्ड कॉपी) महाविद्यालयांकडे सादर करण्यास लॉकडाऊनमध्ये मागास प्रवर्गातील ४ हजार ७९१ विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आहेत. त्यामुळे त्यांना वर्ष लोटले; परंतु अजूनही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

सन २०२०-२१ या वर्षात अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचे समाजकल्याण विभागाकडे ३३ हजार ६४२ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २५ हजार ५७१ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाने मंजूर केले. या प्रवर्गाचे महाविद्यालयांकडे अजूनही २ हजार ४३ विद्यार्थ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे अडकलेले आहेत. याशिवाय विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे १ हजार ११४ अर्ज प्रलंबित आहेत. इतर मागासप्रवर्ग प्रवर्गाचे १ हजार १८५ तर विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे ४७ अर्ज महाविद्यालयाकडे प्रलंबित आहेत.

चौकट.......

किती अर्ज ऑनलाईन सादर केले : एससी प्रवर्ग- ३३६४२, व्हीजेएनटी प्रवर्ग- १७३२२

समाजकल्याण विभागाने निकाली काढले : एससी प्रवर्ग- २४७२६, व्हीजेएनटी प्रवर्ग- १२७७०

महाविद्यालयात प्रलंबित अर्जांची संख्या : एससी प्रवर्ग- १७८२, व्हीजेएनटी प्रवर्ग- १११४

चौकट......

परिपूर्ण अर्ज भरण्याची गरज

विद्यार्थ्यांनी चुकीचा ऑनलाईन अर्ज भरल्यामुळे महाविद्यालयांमध्ये असे २ हजार ७४८ विद्यार्थ्यांचे अर्ज पडून आहेत. त्यासाठी महाविद्यालयांना सूचना केली आहे की असे चुकीचे अर्ज ‘सेंड बॅक टू स्टुडंट’ यावर परत करावे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्रुटी दुरुस्त करता येतील. त्यासाठी अचूक अर्ज भरण्याची ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

- जावेद खान, समाजकल्याण अधिकारी

चौकट.....

विद्यार्थी अडकले गावी

लॉकडाऊन लागल्यामुळे वर्षभरापासून महाविद्यालय बंद आहे. परीक्षाही ऑनलाईन झाल्या. त्यामुळे मी गावी असून शिष्यवृत्ती अजूनही बँकेत जमा झाली की नाही ते माहिती नाही. शिष्यवृत्ती अर्जात त्रुटी निघाल्यामुळे तो महाविद्यालयातच पडून असल्याचे मला गेल्या महिन्यात मित्राने सांगितले.

- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

शिष्यवृत्तीसाठी लॉकडाऊनच्या काळातच शिष्यवृत्तीचा अर्ज ऑनलाईन भरला होता. त्यानंतर आम्हांला गावी जाणे भाग पडले. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यात औरंगाबादेत येऊन शिष्यवृत्तीबाबत चौकशी केली तेव्हा अर्ज चुकल्याची माहिती मिळाली. आता औरंगाबादेत येऊन अर्जात दुरुस्ती करणार आहे.

- शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

-

Web Title: Scholarship applications stuck in several colleges in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.