देखाव्यांची जय्यत तयारी
By Admin | Updated: August 25, 2014 23:59 IST2014-08-25T23:59:52+5:302014-08-25T23:59:52+5:30
जालना: शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून परंपरा असणाऱ्या गणेश मंडळांनी याही वर्षी सामाजिक आशयाच्या अनुषंगाने देखाव्यांची भक्कम तयारी सुरू केली आहे.

देखाव्यांची जय्यत तयारी
जालना: शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्षानुवर्षांपासून परंपरा असणाऱ्या गणेश मंडळांनी याही वर्षी सामाजिक आशयाच्या अनुषंगाने देखाव्यांची भक्कम तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी पावसाअभावी भीषण दुष्काळीस्थिती त्या पाठोपाठा गेल्यावर्षी गारपिटीचा सर्व सामान्य शेतकऱ्यांना मोठा तडाखा बसला. याही वर्षी अपुरा पाऊस दुष्काळी सदृशस्थितीस कारणीभूत ठरतो आहे. त्याचा परिणाम गणेशोत्सवावर उमटतो आहे. नेहमीप्रमाणे याहीवर्षी गणेशोत्सवावर दुष्काळसदृश्य स्थितीचे सावट आहे. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या गणेशोत्सवात यावर्षी बऱ्यापैकी उत्साह जाणवेल, असा अंदाज आहे.
शहरासह जिल्ह्यातील गणेश मंडळांनी लोकवर्गणीतून परंपरेप्रमाणे सामाजिक व धार्मिक आशयांचे देखावे उभारण्यासंदर्भात युद्ध पातळीवर काम सुरु केले आहे. याही वर्षी हे देखावे सर्व सामान्य नागरिकांच्या दृष्टिने लक्षवेधी ठरतील अशी चिन्हे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही देखाव्यांमधून त्या त्या संघटनांसह सत्तारुढ व विरोधी पक्षांचे पदाधिकारी राजकीय संदेश सुद्धा देतील असे चित्र आहे.
मूलभूत सोयी सुविधांचे प्रश्न, पाणीटंचाई, शहरी व ग्रामीण भागातील तासन्तास वीज भारनियमनाचा प्रश्न तसेच दुष्काळी स्थिती, शेतकऱ्यांवरील सुलतानी व अस्मानी असे संकट तसेच अंधश्रद्धांवरील देखावे सुद्धा या गणेशोत्वात लक्षवेधी ठरतील, अशी चिन्हे आहेत.
जालना शहरातील काही गणेश मंडळांकडून धार्मिक आशयांची देखावे सादर होत आले आहेत. विशेषत: नवीन जालना भागातील नवयुवक गणेश मंडळ, ज्योती गणेश मंडळ, लोकमान्य टिळक गणेश मंडळ, तेली समाज गणेश मंडळ, आदर्श गणेश मंडळ तर जुना जालना भागातील चमनचा राजा, श्री ज्ञानेश्वर गणेश मंडळ, मंमादेवी गणेश मंडळ आदी गणेश मंडळांकडून याही वर्षी सुंदर असे धार्मिक देखावे सादर होतील, असे चित्र आहे. काही मंडळांनी प्रसिद्ध मंदिरासह कलाकृतींची प्रतिके सादर केली आहेत. ती मंडळीसुद्धा याही वर्षी जालनेकरांना सुंदर अशा प्रतिकृती सादर करुन त्यांचे लक्ष वेधून घेतील, असे चित्र आहे.
भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर देखावे सादर करणे सुद्धा दिवसेंदिवस जिकिरीचे बनत आहे. साहित्याचा खर्च, वाहतुकीचा खर्च, कलावंतांचे मानधन तसेच अन्य सुविधा उपलब्ध करणे, मंडळांना दिवसेंदिवस अडचणीचे असे ठरते आहे. परंतु त्यातूनही मार्ग काढून गणेश मंडळे यावर्षी उत्तम असे देखावे, सादर करतील असे चित्र आहे.
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेश मंडळांनी मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरु केले आहे. आता एखाद दोन दिवसांत कलावंतांद्वारे प्रत्यक्ष देखावे उभारण्याचे काम सुरु होईल, व गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी देखाव्यांचे काम पूर्ण होईल. दुसऱ्या दिवशी हे देखावे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले होतील. असे चित्र आहे. (प्रतिनिधी)