मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ रोजी मराठवाड्यातील टंचाई आढावा बैठक
By Admin | Updated: November 18, 2014 01:05 IST2014-11-18T01:05:56+5:302014-11-18T01:05:56+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय टंचाई आढावा बैठक बोलाविली आहे. ही बैठक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून,

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ रोजी मराठवाड्यातील टंचाई आढावा बैठक
औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय टंचाई आढावा बैठक बोलाविली आहे. ही बैठक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांकडून अपूर्ण नळ योजना, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च आदींची माहिती मागविण्यात आली आहे. बैठकीचे ठिकाण मात्र निश्चित झालेले नाही.
पुरेशा पावसाअभावी यंदा संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आॅगस्टनंतर पाऊसच न झाल्यामुळे विभागातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. ठिकठिकाणच्या विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. विभागातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्पही रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महसूल विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील ८,१३९ गावांपैकी तब्बल ८,००४ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा खाली आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, तसेच दुष्काळ निवारणारच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २७ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील टंचाईचा आढावा घेणार आहेत. ही बैठक औरंगाबादेत होणार की मुंबईत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांकडून टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या जिल्ह्यात किती नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी किती खर्च लागणार आहे, याची माहितीही सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.