शहरात नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

By Admin | Updated: June 26, 2017 00:51 IST2017-06-26T00:43:03+5:302017-06-26T00:51:39+5:30

औरंगाबाद : यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे

Scarcity of Ninth books in the city | शहरात नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

शहरात नववीच्या पुस्तकांचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : यंदा नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शाळा सुरू होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला असून, नववीच्या मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांची अनेक पुस्तके बाजारात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अर्थात बालभारतीच्या औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे येथील मुद्रणालयात नववीच्या पुस्तकांची छपाई करण्यात येत आहे. बालभारतीने पुस्तकांच्या ५० हजार संचांच्या पहिल्या लॉटचे औरंगाबादेत वितरण केले असल्याचे बोलले जाते; पण शहरातील बहुतांशी सर्वच स्टॉलमध्ये नववीची पुस्तकेच उपलब्ध नाहीत. मग ही पुस्तके गेली कुठे, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. इतिहास आणि भूगोल तसेच विज्ञान या विषयांची पुस्तके कोल्हापूर येथील बालभारती केंद्रातून दोन दिवसात येणार असल्याचे भांडार व्यवस्थापक बी. एन. पुरी यांचे म्हणणे आहे.
सर्व शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीपर्यंतची पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येतात. नववीपासून पुढील वर्गांची पुस्तके पालकांना खरेदी करावी लागतात. यंदा सातवी आणि नववीचा अभ्यासक्रम बदलला आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात येतात. परंतु अभ्यासक्रम बदलेल्या वर्गासाठी बालभारतीकडून पुस्तके वितरित करण्याचे नियोजन यंदा विस्कळीत झाले आहे. भाषा विषयांसह गणित आणि विज्ञान विषयांची पुस्तकेदेखील बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व पालक त्रस्त आहेत. दुसरीकडे पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवावे कसे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

Web Title: Scarcity of Ninth books in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.