माहूर,किनवट, नायगावात टंचाई

By Admin | Updated: August 22, 2014 00:22 IST2014-08-22T00:04:38+5:302014-08-22T00:22:38+5:30

नांदेड : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आणि चारा टंचाईचे चित्र आहे.

Scarcity in Mahur, Kinwat, Nayagaat | माहूर,किनवट, नायगावात टंचाई

माहूर,किनवट, नायगावात टंचाई

नांदेड : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई आणि चारा टंचाईचे चित्र आहे. माहूर तालुक्यातील पिके कोमेजली तर किनवट तालुक्यातील ४ गावात ३ टँकरने सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, अर्धापूर येथे पाणीटंचाई निवारणार्थ बैठक घेण्यात आली.
श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील सर्वात उंच व पैनगंगा नदीपात्रातून बाराशे फुट उंचीवर अतिदुर्गम व जंगलाने वेढलेल्या मौजे अनमाळ गावशिवारातील शेतात आजपर्यंत पेरण्यास मारक ठरलेल्या ५५ मि. मी. पावसाने उगवलेल्या पिकांची वाढ खुंटवत जनावरांसह नागरिकांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर केला. जलस्त्रोता अभावी पंधरा दिवसांत पाणी न पडल्यास गावकऱ्यांवर शेती घरे गुरे सोडून स्थलांतर करण्याची पाळी आलेली आहे.
अनमाळ हे गाव माहूरपासून १९ कि. मी. अंतरावर उंच पहाडावर वसलेले. २५०० लोकसंख्या असलेल्या गावाची तहान भागविण्यासाठी पूर्वीच्या काळात गावतलाव बांधण्यात आला व तलावाच्या उताराकडील भागात मौजे अनमाळ गाव वसवून चार विहिरी बनविण्यात आल्या परंतु तलावाचा पाझर जास्तच असल्याने तलाव हिवाळ्यातच कोरडा होत असल्याने दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी पाऊस न पडल्याने पावसाळा संपण्याच्या आधीच चारही विहिरींनी तळ गाठला आहे तर शेतात एकही विहिर नसल्याने पूर्णत: कोरडवाहू असलेल्या शेतात पावसाचा अंदाज बांधून करण्यात ओल्या तिबार चौबार करण्यात आलेल्या पेरण्यामुळे ईतभर उगवलेल्या कापूस सोयाबीन पिकांनी माना टाकल्या आहेत.
माहूर रुई मार्ग हडसणीच्या अलिकडील अति उंच घाटातून अनमाळ गावाला जाण्यासाठी कठीण वळण व पूर्णत: उखडलेला रस्ता असून या मार्गावरील रस्त्यावर नागरिकांनी स्वातंत्र्यापासून आजपर्यंत एस.टी. पाहिली नसून अनमाळ गावात तर आजपर्यंत ट्रकसुद्धा न गेल्याने पाण्याचे टँकर येणार तरी कसे हा प्रश्न आहे.
नायगाव तालुक्यात जनावरांची उपासमार
गडगा : नायगाव तालुक्यात ६७ हजार ५७ पशुधनांची चाऱ्याअभावी उपासमार होत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. १८ व्या पशुगणनेनुसार नायगाव तालुक्यात मोठी जनावरे बैल, गाय, म्हैस ४९ हजार ७९, छोटी जनावरे १५ हजार ८३२ अशी एकूण पशुधन संख्या ६७०५७ एवढी आहे. सन २०१२-१३ मध्ये ९ वी पशुगणना करण्यात आली परंतु सांख्यिकी मान्यता नसल्याचे कारणाने वाढीव पशुधन संख्येचा यात समावेश नाही. दरवर्षी खरीप हंगामात जून, जुलै, आॅगस्ट या तीन महिन्यात जोरदार पाऊस होत असतो. त्यामुळे शेतात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असे. परंतु यंदाची स्थिती उलट आहे. अर्धा पावसाळा संपत आला असला तरी दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेल्याम जमा आ६े. शेतकऱ्यांकडील चारा (कडबा) दोन महिन्यापूर्वीच संपला होता. आज ना उद्या तरी मोठा पाऊस झाल्यानंतर हिरवा चारा उपलब्ध होईल. या अपेक्षेवर पाणी फिरले आहे. चारा मिळविण्यासाठी शेतकरी सर्वदूर शोध घेत असून कंधार तालुक्यातील बारुळ, कौठा, शिरसी परिसरातून २००० ते २५०० रुपये प्रतीटन दराने खरेदी करुन पशुधन जगविण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु येत्या काही दिवसात संपल्यानंतर काय करावे? हा यक्षप्रश्न कायम आहे. शासनाने मराठवाडतील काळग्रस्त भागात जनावरांना जगविण्यासाठी चारा डेपो तात्काळ सुरू करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)
टँकर वाढणार
किनवट : अल्पपावसामुळे किनवट तालुक्यातील चार गावात तीन टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. आॅगस्टअखेर पाऊस न झाल्यास टँकरची संख्या वाढेल. तालुक्यात १९१ गावे व १०७ वाडी तांडे आहेत. तालुक्याचे वार्षीक पर्जन्यमान १ हजार २४० मि.मी. असताना आत्तापर्यंत केवळ १९६ मि.मी. पाऊस झाला. पावसाअभावी नदी नाले कोरडेठाक बनले. सद्यस्थिती रामपूर, भामपूर, भारेगाव, धानोरा सी. येथे तीन टँकरने पाणीपुरवठा सुरुच आहे. ४८ गावात विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आहेत. येत्या काही दिवसांत मोठा पाऊस आला नाही तर कनकी, कनकीतांडा, जगदंबाताडा, परसरामनाईकतांडा या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे.(वार्ताहर)
कंधारात हिरव्या चाऱ्याला सोन्याचा भाव
कंधार : तालुक्यावर कोरड्या दुष्काळाची गडद छाया पसरली आहे़ शिवारात खरीप हंगामाचा थांगपत्ता नसल्याने हिरवा चारा नाही़ पशूधनाचे संगोपन करण्यासाठी शेतकऱ्यांची धावाधाव चालू आहे़ हिरवा चारा सोने भावात मिळत असून बेमोसमी ऊसाची सर्रास खरेदी केली जात असून त्याला मिळविण्यासाठी झुंबड उडाल्याचे चित्र आहे़ त्यामुळे अल्प ऊस लागवड केलेल्या बेमोसमी ऊसावर कोयत्याचा घाव पडत आहे़
अडीच महिन्याचा काळ लोटला़ पावसाचे प्रमाण कमी असल्याचा अंदाज वर्तविला जात होता़ परंतु कोरडा दुष्काळ पडेल इतपत स्थिर राहील, अशी जाणीव नागरिक-शेतकऱ्यांना नव्हती़ शेतीचा खरीप हंगाम ६१ हजार ५०० हेक्टरवरचा आहे़ परंतु दुबार-तिबार पेरणी करूनही पिके कोमात आहेत़ अपुऱ्या पावसाअभावी पिकांचे पोषण झाले नाही़ त्यामुळे वाढ खुंटली आहे़ पशूधनाचे संगोपन होण्यासाठी शेतकरी गवताची लागवड बांधावर-धुऱ्यावर करतो़ परंतु हिरवे गवत कोठे नसल्याने पशूधनाची मोठी परवड चालू आहे़
पाणी-चारा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी मानार आणि जगतूंग समुद्रातील गाळ पेऱ्यात गोठे समान वातावरण केले आहे़ तरीही चारा अपुरा होत असल्याने पशूपालकांनी आपले पशूधन नायगाव, हाळी-हंडरगुळी, लोहा, जांब बु़ येथील बाजारात विक्रीसाठी मोठा सपाटा चालू केला आहे़ परंतु कोरडा दुष्काळजन्य परिस्थितीचा फटका बाजारात दिसत आहे़ कवडीमोल भावाने पशूधनाची किंमत केली जात असल्याची तीव्र भावना पशूपालकांतून व्यक्त होत आहेत़ चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत असल्याने पशूपालक धास्तावले आहेत़ मानार नदीपात्रातील गाळपेरा पशूधनासाठी आता आधारवड ठरू पाहत होता़ लहान आकाराची पेंडी २०-२५ रुपये दराने विक्री होत आहे़ खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात झुंबड उडाल्याने हिरवा चारा झटपट संपत असून शेतकऱ्यांची पुन्हा धांदल सुरू झाली़ नॅनो कारच्या किंमतीबरोबरी साधणारे लालकंधारी नर जोडी आता चाऱ्याअभावी गोठ्यात आली आहेत़ त्यातून मार्ग काढणे शेतकऱ्यांना कठीण झाले होते़ परंतु शेतकऱ्यांनी आपला मोर्चा बेमोसमी ऊसाकडे वळविल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे़(वार्ताहर)

Web Title: Scarcity in Mahur, Kinwat, Nayagaat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.