सव्वालाख पशुधनासाठी डॉक्टरांची वानवा
By Admin | Updated: July 24, 2014 00:07 IST2014-07-23T23:32:22+5:302014-07-24T00:07:45+5:30
नितीन कांबळे , कडा तालुक्यात जवळपास सव्वालाख पशुधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहण्यासाठी डॉक्टरांची मात्र वानवा आहे.

सव्वालाख पशुधनासाठी डॉक्टरांची वानवा
नितीन कांबळे , कडा
तालुक्यात जवळपास सव्वालाख पशुधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहण्यासाठी डॉक्टरांची मात्र वानवा आहे. अनेक ठिकाणच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त असल्याने वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना खाजगी पशुचिकित्सकांकडे जनावरांना घेऊन जावे लागते. यावर मोठा खर्चही होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
आष्टी तालुका हा बीड जिल्ह्यात दुग्धोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तालुक्यात बहुतांश डोंगराळ व पठाराच्या भागात शेती असल्याने बागायती जमीनही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. दुसरे म्हणजे या तालुक्यातील ऊसतोड मजूरही मोठ्या प्रमाणात ऊसतोडीला जातात. यासाठीही त्यांच्याकडे बैलजोडी असते. शिवाय शेती कसण्यासाठीही अनेकांकडे पशुधन आहे. एकंदरीत तालुक्यात सध्या लहान- मोठे सव्वा लाखापेक्षा जास्त पशुधन आहे.
या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये प्रथमश्रेणीचे १४ तर द्वितीय श्रेणीचे ७ पशुचिकित्सालये आहेत. येथे सध्या पंधरा पशुधन अधिकारी असून त्यांच्यावरच पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी आहे. येथील सुलेमान देवळा, पिंपळा, जामगाव, टाकळसिंग, हरिनारायण आष्टा, डोईठाण या श्रेणी १ च्या दवाखान्यात अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
शेती कसताना किंवा इतर वेळी अनेकदा जनावरांना इजा होते. अशावेळी शेतकरी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात जनावरांना घेऊन जातात. अशावेळी तेथे डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांना निराश होऊन परतावे लागते. अशावेळी नाइलाजाने शेतकऱ्यांना खाजगी पशु चिकित्सकाकडून उपचार करून घ्यावे लागतात. अनेकदा गाय, म्हैस गंभीर आजारी असल्यास त्यांना दवाखान्यात आणणेही शक्य होत नाही. अशा वेळी डॉक्टरांना शेतकऱ्यांच्या गोठ्यावर घेऊन जावे लागते. मात्र दवाखान्यातच डॉक्टर नसल्यास गोठ्यावर कसे घेऊन जाणार त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी चिकित्सकाला न्यावे लागते. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने रिक्त जागा भरण्यासह औषधी उपलब्ध करण्याची मागणी राम खाडे, दादा गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक राठोड म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठांना अहवाल दिला आहे.
डॉक्टरांच्या जागा भरण्याची मागणी
आष्टी तालुक्यात २१ ठिकाणी आहेत पशुवैद्यकीय दवाखाने.
पंधरा अधिकाऱ्यांवरच २१ ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा भार.
सुलेमान देवळा, पिंपळा, जामगाव, टाकळसिंग आदी ठिकाणच्या जागा रिक्त.