महावितरणकडून सव्वाशे नोटिसा

By Admin | Updated: June 23, 2016 01:36 IST2016-06-23T01:01:33+5:302016-06-23T01:36:05+5:30

औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत

Savvy notes from Mahavitaran | महावितरणकडून सव्वाशे नोटिसा

महावितरणकडून सव्वाशे नोटिसा


औरंगाबाद : महावितरणने शहरात सध्या कायमस्वरुपी वीज बंद केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम उघडली आहे. यामध्ये आतापर्यंत ११५ जणांनी बेकायदेशीररीत्या दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
महावितरणच्या नियमानुसार वीज देयक न भरणाऱ्या तसेच प्रत्यक्ष वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई करून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केला जातो. संबंधित ग्राहकांचे मीटरही काढून घेण्यात येते. या ग्राहकांना नव्याने कनेक्शन देणे हा गुन्हा आहे. तरीही शहरात अशा किती तरी ग्राहकांना नवीन मीटर दिले गेले आहे.
महावितरण कंपनीने सध्या कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांची तपासणी मोहीम हाती घेतली आहे. पंधरा दिवसांपासून महावितरणचे पथक अशा ग्राहकांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहेत. आतापर्यंत सुमारे ११५ जणांना नियमाविरुद्ध मीटर दिले गेल्याचे आढळून आले आहे. यातील काही जणांनी त्याच नावाने तर काही जणांनी दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने मीटर घेतले आहे.
ही बाब आढळल्यामुळे महावितरण कंपनीने या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत. शहरात कायमस्वरुपी वीज कनेक्शन कापलेल्या ग्राहकांची संख्या ही सुमारे ३० हजार इतकी आहे. महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, पंधरा दिवसांपासून शहरात पीडी (कायमस्वरुपी वीज कापलेल्या) ग्राहकांची तपासणी सुरू आहे. पीडी ग्राहकांची संख्या मोठी आहे.
सध्याच्या काळात विजेशिवाय राहणे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे हे लोक कुठून तरी वीज वापरत असणार हे नक्की आहे. म्हणूनच ते कुठून वीज वापरताहेत, त्यांना नवीन मीटर दिले गेले आहे का, दिले असेल तर ते कुणी दिले याची माहिती घेतली जात आहे.
आतापर्यंत शहरात ११५ जणांनी दुसरे मीटर घेतल्याचे आढळून आले आहे. सध्या त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

Web Title: Savvy notes from Mahavitaran